अहमदनगर

नेवासा : लाखो भाविकांनी घेतले ‘पैस’ दर्शन

अमृता चौगुले

नेवासा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : तीर्थक्षेत्र नेवासा येथे कामिका वद्य एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या पैस खांबाचे दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी पुंडलिक वरदे…हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषाने नेवासा नगरी दुमदुमली होती. शेकडो दिंड्यांनी यावेळी माऊलीचा गजर करीत हजेरी लावली. काल पहाटे 4 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख व जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठलराव अभंग व लताताई अभंग, व्यापारी योगेश रासने व रुपाली रासने, वसंत रासने व सविता रासने यांच्या हस्ते माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या पैस खांबास वेदमंत्राच्या जयघोषात सपत्नीक अभिषेक घालण्यात आला.

विधीचे पौरोहित्य उदय सभारंजन यांनी केले. पहाटेच्या झालेल्या अभिषेकप्रसंगी मंदिराचे विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, भिकाजी जंगले, रामभाऊ जगताप, कृष्णाभाऊ पिसोटे, कैलास जाधव, व्यापारी देवीदास साळुंके, डॉ.संजय सुकाळकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप वाकचौरे, समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले, जालिंदर गवळी, भय्या कावरे, शिवा राजगिरे उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर माऊलींची यात्रा कामिका एकादशीला भरत असल्याने श्री.क्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक, आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार संभाजीराव फाटके, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर शिंदे, विश्वासराव गडाख यांनी यावेळी माऊलींच्या पैस खांबाचे दर्शन घेतले. त्यांचे देवस्थानचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख व संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी स्वागत केले.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणाबाहेर दर्शनबारी रांगेसह मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. एक किलोमीटर अंतरावर दर्शन बारी रांग दिसत होती. मंदिर प्रांगणात आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळ, तसेच पंचगंगा सीडस् कंपनीतर्फे बाळासाहेब शिंदे, प्रभाकर शिंदे, काकासाहेब शिंदे यांच्यातर्फे भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. मंदिराकडे येणार्‍या रस्त्यावर रवी तलवार, सचिन तलवार, सुधीर तलवार, घुले पाटील पतसंस्था, सुवर्णकार समाज, आम आदमी पार्टीतर्फे खिचडी, केळी, पाणी बॉटलचे मोफत वाटप करण्यात आले.

तहसीलदार डॉ.संजय बिरादार, पोलिस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकांचौकात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे यांच्या समाधी मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली. नेवासा शहरासह संत ज्ञानेश्वर मंदिर रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

वारकरी दिंड्यांचा गजर!
आषाढी वद्य कामिका एकादशीनिमित्त तालुक्यासह राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव भागातील शेकडो दिंड्यांनी येथे ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करीत येथे हजेरी लावली. यावेळी आलेल्या सर्व वारकर्‍यांचे मंदिर देवस्थानचे शिवाजी महाराज देशमुख, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग अभंग आदींनी स्वागत केले.भाविकांनी रिंगण धरून फुगडीचा आनंद लुटला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT