आम्ही शरद पवारांसोबत ठाम : जयंत पाटील | पुढारी

आम्ही शरद पवारांसोबत ठाम : जयंत पाटील

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा :  मी आदरणीय शरद पवार यांच्या सोबतच आहे. पवार साहेबांच्या सोबत असणारे आम्ही सर्व आमदार साहेबांच्या विचारधारेवर ठाम आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली.

आ. जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा चर्चा सुरू असताना आ. पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर अनेक आमदार उपमुख्यमंत्री अजित यांच्यासोबत गेले. तर अजूनही काही आमदार त्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनाही आपल्याकडे आणण्यासाठी अजित पवार गटाचे प्रयत्न सुरु असल्याचे तसेच अजित पवार यांनी स्वतः जयंत पाटील यांना फोन केल्याचीही चर्चा सुरू होती. यावर गुरुवारी आ. जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही. मी आदरणीय शरद पवार यांच्या सोबतच आहे. पवार साहेबांच्या सोबत असणारे आम्ही सर्व आमदार साहेबांच्या विचारधारेवर ठाम आहोत. आमच्यातील कोणीही त्यांच्या संपर्कात नाही. अफवा पसरविणार्‍यांबद्दल आम्ही काय बोलणार.

Back to top button