अहमदनगर

सुपा : डोक्यात कुर्‍हाड घालून एकाचा खून; नारायणगव्हाण येथील घटना

अमृता चौगुले

सुपा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नारायणगव्हाण (ता. पारनेर) येथे जुन्या वादातून एकाचा डोक्यात कुर्‍हाडीचा घाव घालून खून करण्यात आला. गुरुवारी (दि.22) रात्री ही घटना घडली. या गुन्ह्यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, की संतोष बबन गायकवाड (वय 47), भाऊसाहेब भिमाजी गायकवाड हे दोघे खासगी कामानिमित्त मोटरसायकलवरून फाट्यावर गेले होते. काम आटोपून ते रात्री साडेनऊच्या सुमारास नारायणगव्हाण येथे घरी येत होते.

ते पुणे-नगर महामार्गावर हॉटेल जगदंबाच्या जवळ आले तेव्हा मागून आलेल्या मोटरसायकलवरील तिघांपैकी एकाने गायकवाड यांच्या मोटरसायकलला लाथ मारली. त्यामुळे संतोष व भाऊसाहेब रस्त्यावर पडले. त्या वेळी भाऊसाहेब अंधारात पळून गेला. संतोषला दुसर्‍या मोटरसायकलवरील तिघांनी रस्त्यावरच कुर्‍हाडीने मारहाण केली. त्यात संतोषचा मृत्यू झाला.

गायकवाड व दरेकर कुटुंबीयांत प्रेमप्रकरणातून सात-आठ महिन्यांपासून वाद होता. दरम्यानच्या काळात भगवान दरेकर, अजिंक्यतारा दरेकर, विष्णू दरेकर, नारायण दरेकर, सोमनाथ दरेकर, हनुमंत दरेकर, यांनी गायकवाड कुटुंबाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती; परंतु तो वाद आपसात चर्चा करून मिटविला होता.

आयुष भगवान दरेकर, यश राजेंद्र अवचिते, प्रकाश भारत घोडके यांच्यासह नऊ जणांनी कटकारस्थान करून मागील भांडणाचा राग धरून माझे पती संतोष बबन गायकवाड यांना कुर्‍हाड डोक्यात मारून ठार मारले, अशी फिर्याद सुरेखा संतोष गायकवाड यांनी दिली आहे. सुप्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी पाच संशयितांना पोलिस ठाण्यात आणले असून, आणखी चार जणांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT