बोधेगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : केदारेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील 35 गावे आणि पाथर्डी तालुक्यातील काही गावांना शेतीसाठी जायकवाडी धरणाचे पाणी बारा महिने कायमस्वरूपी मिळावे, यासाठी परिसरातील तरूणांना सोबत घेऊन मोठा लढा उभारणार असल्याची घोषणा संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी केली.
बोधेगाव येथील ग्रामदैवत साध्वी बन्नोमाँ दर्ग्यात बोधेगाव ग्रामस्थांनी शुक्रवारी दि.23 अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, उपाध्यक्ष माधव काटे यांच्यासह सर्व संचालकांचा नागरी सत्कार केला. यावेळी ढाकणे बोलत होते. अध्यक्षस्थानी आस्मानराव घोरतळे होते. ढाकणे म्हणाले, बबनराव ढाकणे यांनी या भागाला पाणी मिळण्यासाठी पाटफोडो आंदोलन करून मोठा संघर्ष केला. त्यांचा हाच संघर्षाचा वारसा मला मिळाला आहे. त्यांनी त्यावेळच्या तरूणांना बरोबर घेऊन हा लढा उभारला होता.
केदारेश्वरच्या कार्यक्षेत्रातील गावांना कायमस्वरुपी पाणी मिळण्याचे त्यांचे अपुरे स्वप्न परिसरातील युवकांना बरोबर घेऊन भविष्यात पाण्यासाठी मोठे जनआंदोलन उभे करणार आहे. त्यासाठी अभ्यास करणार असून, यासाठी माहिती असेल, सूचना असतील त्यांनी पुढे येऊन सांगावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी रामजी अंधारे, बन्नोमाँ यात्रा पंचकमेटीचे अध्यक्ष कुंडलिक घोरतळे, डॉ. प्रकाश घनवट, भाऊराव भोंगळे, सुनील खंडागळे, अनिल घोरतळे, प्रसाद पवार, दिनकर खोले, गंगाधर घोरतळे, चांद सय्यद, केदारेश्वरचे कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकिय अधिकारी पोपट केदार, अंबादास दहिफळे, सुधाकर खोले उपस्थित होते. आयुब शेख यांनी सूत्रसंचालन केले. नामदेव कसाळ यांनी आभार मानले.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार मोनिका राजळे यांचे बोधेगावचे विश्वासू सहकारी रामकाका केसभट यांनी अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे व उपाध्यक्ष माधव काटे यांचा व्यासपीठावर येवून सत्कार केला. त्यानंतर ते कार्यक्रमातून निघून गेले.
हेही वाचा