

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पामध्ये (एसटीपी) प्रक्रिया केलेले पाणी न वापरणारी बांधकामे बंद करण्याचे आणि बांधकामांची तपासणी करण्याचे आदेश दिल्याबरोबर एसटीपीच्या पाण्याचा वापर वाढला आहे. एका दिवसात शुक्रवारी 15 टँकर प्रक्रिया केलेले पाणी गेल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. महापालिकेकडून शहरात 11 एसटीपी प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या प्रकल्पात प्रक्रिया केलेल्या पाण्याची गुणवत्ता चांगली आहे.
त्यामुळे, महापालिकेने हे पाणी बांधकामांना वापरणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी पालिकेने स्वतंत्र मोबाईल अॅपही विकसित केले असून, त्याबाबत प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. मात्र, शहरातील 326 बांधकामांपैकी केवळ 118 बांधकामांची नोंदणी होती. तसेच त्यातील काही ठिकाणीच टँकर मागविले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी कार्यकारी अभियंते तसेच उपअभियंत्यांची बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी बांधकामांची तपासणी करावी आणि पिण्याचे पाणी वापरले जात असल्यास बांधकाम बंद ठेवण्याची नोटीस बजाविण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे महापालिकेची कारवाई सुरू होताच एसटीपीच्या पाण्याची मागणी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. एका दिवसात 15 ते 20 टँकरने वाढली आहे.
मैदाने, उद्याने, गोल्फ कोर्सलाही एसटीपीचे पाणी
महापालिकेकडून शहरातील गवताळ मैदाने, मातीची मैदाने, गोल्फ कोर्स यांच्यासाठी प्रक्रिया केलेले पाणीच वापरण्याचे बंधन घातले जाणार आहे. याचे आदेश लवकरच काढले जातील, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. हे बंधन केवळ उन्हाळ्याच्या कालावधीत निर्माण होणार्या पाणीटंचाई पुरते नसून, वर्षभरासाठी हे बंधनकारक केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एसटीपीच्या पाण्याची मागणी पाच लाख लिटरवर गेली असून, हे पाणी दिवसाला 20 लाख लिटर वापरण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.