अहमदनगर

‘जलजीवन’ने रोखले नगरकरांची अमृत पाणी योजना

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शहरासाठी अत्यंत जिव्हाळ्याची असणारी अमृत पाणी योजना पूर्ण झाली आहे. परंतु, प्रादेशिक जीवन प्राधिकरणचे अधिकारी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामात व्यस्त असल्याने 'अमृत'च्या वितरण व्यवस्थेचा मुहूर्त लांबणीवर पडत आहे. परिणामी 'अमृत'चे पाणी टाकीत येऊन पडले, तरी त्याचे वितरण योग्य पद्धतीने होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी मिळावे, यासाठी केंद्र सरकारच्या निधीतून अमृत पाणी योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून योजनेचे काम सुरू आहे. मुळा धरण, विळद जलशुद्धीकरण प्रकल्प ते वसंत टेकडी येथील पाण्याच्या टाकीपर्यंत अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. मुळा धरण ते वसंत टेकडीपर्यंत पाईपलाईनमधून पाण्याची चाचणी घेण्यात आली आहे. आठ दिवस गढूळ पाणी आल्यानंतर आता स्वच्छ पाणी वसंत टेकडी येथे येत आहे. त्यातही अजून 'अमृत'चे काही पंप सुरू करणे बाकी आहे.

अमृत योजनेची यशस्वी चाचणी घेणे, त्याचबरोबर शहरात वितरण व्यवस्थेची चाचणी घेऊन योजना महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची जबाबदारी प्रादेशिक जीवन प्राधिकरणाची आहे. शासनाच्या आदेशानुसार अमृत पाणी योजनेचे कामच जीवन प्राधिकरणच्या अधिपत्याखाली झाले आहे. तरी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी स्वतः काही कामाची जबाबदारी घेतली म्हणून पाणी वसंत टेकडीपर्यंत पोहचले आहे. दरम्यान, शहरातील वितरण व्यवस्थेचे नियोजन करून देण्याची जबाबदारी जीवन प्राधिकरणची आहे.

मात्र, प्राधिकरणचे अधिकारी जिल्ह्यातील 'जलजीवन'च्या कामात व्यस्त असल्याने त्यांचे महापालिकेच्या 'अमृत'च्या वितरण व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. महापौर रोहिणी शेंडगे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला अधिकारी उपस्थित राहिले. त्यांनी निर्मलनगरमधील टाकीमध्ये पाणी टाकून चाचणी घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप निर्मलनगरमधील टाकीत पाणी टाकलेच नाही.

अशाच प्रकारे शहरातील तीन ते चार टाक्यांमध्ये पाणी टाकून चाचणी घेणे आवश्यक आहे. मात्र, जीवन प्राधिकरणचे अधिकारी जलजीवनच्या कामात गुंतल्याने शहरातील पाणी वितरणाच्या चाचणीला विलंब होत असल्याचे समजते. याबाबत जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एस. आर. वारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.

10 एमएलडी पाणीवाढ

नगर शहराला जुन्या लाईनद्वारे 72 एमएलडी (72 दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणी मिळत आहे. आता अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्याने त्यात दहा एमएलडीची वाढ झाली आहे. वसंत टेकडी येथील जुनी टाकी व नवीन टाकी अशा दोन्ही टाक्यांची पाण्याची लेव्हल मिळत आहे. पूर्वी पाण्याची लेव्हल मिळत नव्हती. आता पाणी पुरेसे आहे; पण वितरणाचे नियोजन अजून जीवन प्राधिकरणकडून मिळालेले नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT