अहमदनगर

नगर ‘जलसंपदा’ रेडी; आदेशाची प्रतीक्षा!

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नगर, नाशिकच्या धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने साडेआठ टीएमसी पाणी जायकवाडीला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 12 डिसेंबरला यावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या आदेशानंतर नगर जलसंपदा विभागाने धरणे व नदीपात्रातील कोल्हापूर बंधार्‍यांची पाहणी करून तसा अहवाल पाठविला आहे. जलसंपदा विभागाची तयारी पूर्ण असली तरी आदेशाची प्रतीक्षा कायम आहे.

संबंधित बातम्या :

नगरमधील संजीवनी साखर कारखाना व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि सहकारमहर्षी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध दर्शवीत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. त्या सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत पाणी सोडण्यास स्थगिती देण्यास नकार दर्शविला. 12 डिसेंबरच्या निकालात नगर, नाशिकमधील धरणांतून जायकवाडीला पाणी सोडावे लागणार की कसे? याकडे नगर, नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

नगरच्या धरणांतून मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोधच आहे. धरण पाणलोटात पाऊस झाल्याने पाणी साठले. मात्र नेवासा तालुक्यात पर्जन्यमान कमी आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील शेतकर्‍यांना लाभ झाला पाहिजे. धरणातील पाणी सोडताना अपव्यय होईल. मेंढेगिरी समितीच्या अहवालाचे पुनर्विलोकन झाल्यानंतरच निर्णय घेणे उचित ठरेल. जर पाणी सोडण्याची वेळ आली तर निळवंडेचे पाणी सोडले पाहिजे.
                                                                     – शंकरराव गडाख, आमदार

राज्य शासनाने हायकोर्टाच्या आदेशाचे पालन न केल्याने अवमान झाला. याबाबत याचिका दाखल केली का?, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली. मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय झाला, असा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ काढू नये. राज्य शासनाने न्यायालयाचा आणखी अवमान करू नये आणि जायकवाडीला नगर, नाशिकमधील धरणातून पाणी सोडू नये.
                                                               – आशुतोेष काळे, आमदार 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT