अहमदनगर

अहमदनगर : वाळू व्यवसायावर माफियांचाच प्रभाव; महसूलमंत्री विखे पाटील यांची कबुली

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पूर्वी काळ्या बाजारातून वाळू मुबलक मिळत होती. सध्या शासनाकडून जनतेची मागणी पूर्ण करता येत नाही. मात्र, नवीन वाळू धोरणामुळे जनता समाधानी आहे. वाळू व्यवसायावर अद्याप वाळूमाफियांचा प्रभाव दिसून येत असल्याची कबुली राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या जोडीदारांचा सत्कार कार्यक्रमानंतर विखे पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते.

शासकीय वाळू उपलब्ध होत नसल्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले असताना, विखे पाटील म्हणाले की, नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी जिल्ह्यात केली जात असून, जनतेला अत्यंत माफक दरामध्ये वाळूचा पुरवठा करण्यात येत आहे. वाळूची मागणी आणि पुरवठा यांचा मेळ बसत नसल्याचे त्यांनी अवर्जून सांगितले. वाळू वितरणाची प्रणालीही अधिक सक्षम करत जनतेला पुरवठा सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले आहे. जिल्ह्यातील बेकायदेशीर शाळा आणि तेथील प्रवेश यावर शिक्षणाधिकारी यांनी लक्ष ठेवावे. मान्यताप्राप्त शाळांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करावी. जेणेकरून पालकांची गैरसोय होणार नाही. असे एका प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले.

काँग्रेस पक्षात फक्त पुढारीच शिल्लक

राज्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्वच राहिले नाही. या पक्षात आता फक्त पुढारीच राहिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीकडे 28 जागांची मागणी केली असली तरी अंतिम क्षणी 2 जागा दिल्या तरीही ते होकार देतील, असा टोला विखे पाटील यांनी काँग्रेसला लगावला आहे.

SCROLL FOR NEXT