अहमदनगर

अहमदनगर : हातात हात की पुन्हा पायात पाय?

अमृता चौगुले

अहमदनगर : जिल्ह्यातील 11 हजार गुरुजींच्या भावना गुंतलेली विकास मंडळाची 56 गुंठ्यांची प्रशस्त जागा केवळ राजकीय कुरघोडीत आजही वापराअभावी ओसाड आहे. रोहोकले गुरुजींच्या संकल्पनेतील नाट्यगृहावर विरोधकांनी केव्हाच पडदा टाकला, आता बापूसाहेब तांबे यांनी दाखविलेले 'मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल'चे स्वप्नही भंगण्याच्या वळणावर आले आहे. अशा या राजकारणामुळेच विकास मंडळाचा 'विकास' थांबला असून, आता 20 ऑगस्टच्या सभेत तरी सर्व गुरुजी हॉस्पिटलसाठी एकमत दाखवतील, की पुन्हा रोहोकले गुरुजींप्रमाणे बापूसाहेब तांबेंचाही ड्रीम प्रोजेक्ट पायात पाय घालून हाणून पाडतील, याकडे सभासदांचे लक्ष आहे.

चिमुरड्यांना ज्ञान देणारे गुरुजी वार्षिक सभेत एकमेकांवर तुटून पडताना अनेकदा दिसले. हेच गुरुजी विकास मंडळाच्या बाबतीतही एकमेकांच्या पायात पाय घालण्यात मागे नसल्याचे पाहायला मिळाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन केलेली आणि बांधकाम सुरू झालेली विकास मंडळाची इमारत याच गुरुजींनी कोटीहून अधिक खर्चानंतर हाणून पाडली! वास्तविक शिक्षक बँकेच्या आर्थिक व्यवस्थेसाठी 1985 मध्ये विकास मंडळाची स्थापना झाली. बँकेचे सर्व सभासद 100 रुपयांत विकास मंडळाचे सभासद झाले.

धनवटे गुरुजी हे पहिले संस्थापक अध्यक्ष होते. बँकेच्या माध्यमातूनच विकास मंडळाने 52 गुंठे जागा खरेदी केली. या जागेवर वसतिगृह होते. 1991च्या दरम्यान क. या. काळे अध्यक्ष असताना समोरच गुरुकुल इमारत उभारली गेली. त्यासाठी शिक्षकांनी बँकेमार्फत प्रत्येकी एक हजार रुपये वर्गणी विकास मंडळाला दिली. दरम्यान 1991 ते 2016 या काळात या जागेकडे दुर्लक्ष झाले. वसतिगृहाची इमारत जीर्ण झाली होती. खोल्या गळत होत्या. अनेकांनी अतिक्रमण केले होते. त्या वेळी शिक्षक बँकेच्या चाव्या रावसाहेब रोहोकले यांच्या नेतृत्वातील गुरुमाऊली मंडळाकडे होत्या. त्याच वेळी विकास मंडळाचा कारभारही त्यांच्याकडे होता.

त्यामुळे विकास मंडळाच्या जागेच्या विकासासाठी तत्कालीन अध्यक्ष संजय शिंदे यांनी सहकार्‍यांसमवेत पुढाकार घेतला. 2016मध्ये झालेल्या विकास मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या जागेवर नवीन बांधकाम करण्याचा ठराव आला. यात 850 आसनक्षमतेचे नाट्यगृह, व्यावसायिक गाळे, अद्ययावत वसतिगृह, बहुउद्देशीय दोन हॉल आणि दुमजली पार्किंग व्यवस्थेचा समावेश होता. साडेनऊ कोटीचे हे बजेट होते. त्याची निविदाही झाली होती. या कामासाठी आर्थिक तरतूद गरजेची असल्याने, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष रोहोकले गुरुजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सभेत ठेवीतून प्रतिशिक्षक 10 हजार रुपयांप्रमाणे वर्गणी वळविण्याचा ठराव आला.

मात्र त्या वेळी काही नेते व सभासदांनी यास विरोध केला आणि रोहोकले यांचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे ही वर्गणी ऐच्छिक करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर काही शिक्षक सभासदांनी साधारण एक कोटीची वर्गणी जमा केली. अर्थात यापूर्वीच इमारत कामासाठी पुणे धर्मादाय आयुक्तांची, तसेच 42 लाख रुपये भरून महापालिकेची परवानगी घेण्यात आली. डिसेंबर 2018 मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते या इमारतीच्या कामाचे थाटामाटात भूमिपूजन झाले. मात्र 2019 मध्ये 'गुरुमाऊली'त उठाव झाला आणि बापूसाहेब तांबे यांचे नेतृत्व पुढे आले. बँकेची सत्ता तांबे गटाकडे गेली. साहेबराव अनाप पहिले चेअरमन झाले.

त्यानंतर बँकेतून मिळणार्‍या वर्गणीला अडचणी आल्याचे तत्कालीन सत्ताधारी आजही सांगत आहेत. दुसरीकडे रोहोकले गुरुजींच्या नेतृत्वातील विकास मंडळाने बँकेकडून ठेवी घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण केली नाही. बँकेने परस्पर ठेवी दिल्या, तर त्यांच्या व्याजाचे काय? त्या परत कधी देणार? याबाबत बँकेशी कोणताही करार केला नाही. उपनिबंधकांनीही 'जर ठेवी वळविल्या आणि त्यांचा दुरुपयोग झाला, तर संचालक मंडळ जबाबदार असेल,' असे स्पष्ट केले होते.

त्यामुळे तत्कालीन संचालकांनी यास विरोध करून करार पूर्ण न करणार्‍या रोहोकले यांवरच खापर फोडले. निविदेतील गोंधळ, जवळच्या ठेकेदाराला दिलेले काम, त्याला दिलेली रक्कम, अशा वेगवेगळ्या कारणांतून राजकीय रंग उधळले गेले. यातून रोहोकले गुरुजींचे नाट्यगृह सुरू होण्यापूर्वीच शिक्षक नेत्यांनी बंद पाडले.

दरम्यान, आज विकास मंडळ आणि शिक्षक बँक हे दोन्ही शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्याकडे आहे. त्यांनीही या जागेवर गुरुजी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निवडणुकीच्या प्रचारात शब्द दिला होता. त्याच्या पूर्ततेसाठी 20 ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत प्रत्येक सभासदाकडून 20 हजार रुपये कायम ठेवीतून वळविण्याबाबत विषय मांडला आहे.

या गोष्टीलाही आता विरोध सुरू झाला आहे. एकमेकांशी न पटणारे सर्व विरोधक एकत्र आले आहेत. त्यांची समन्वय समिती तयार झाली आहे. त्यामुळे या सभेत नाट्यगृहाप्रमाणेच गुरुजींचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल शिक्षक नेते हाणून पाडणार का? की सर्व शिक्षक नेते राजकीय जोडे बाजूला ठेवून पैसे उपलब्ध करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT