अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : दलालामार्फत बनावट कागदपत्रे तयार करून भारतात घुसखोरी केलेल्या आणि नाशिक व नगरच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) खंडाळा (ता. नगर) येथून अटक केलेल्या चार बांगलादेशी नागरिकांनी भारतात दहशतवादी कृत्ये केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या चारही घूसखोरांना शुक्रवारी (दि. 25) न्यायालयाने 1 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मो. मोहीउद्दीन नाझीम शेख, शहाबुद्दीन जहांगीर खान, दिलावरखान सिराजउल्ला खान व शहापरान जहांगीर खान (सर्व रा. सध्या खंडाळा) अशी या घूसखोरांची नावे आहेत.
त्यांच्यासह बनावट पासपोर्ट व इतर कागदपत्रे तयार करून देणार्या पश्चिम बंगाल व बांगलादेशातील 10 जणांविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कागदपत्रे तयार करून देणारे रासल एजाज शेख, सोहेल, माणिक खान, नोमान, अब्दुल कादर (सर्व रा. बांगलादेश, पूर्ण नाव, पत्ते नाहीत), कोबीर मंडल (उत्तर 24 परगाना, पश्चिम बंगाल, पूर्ण नाव पत्ते नाहीत) अशी संशयितांची नावे आहेत.
मो. मोहीउद्दीन शेख सात ते आठ वर्षांपासून, शहाबुद्दीन आठ महिन्यांपासून, दिलावरखान तीन महिन्यांपासून आणि शहापरान सहा महिन्यांपासून खंडाळा येथे राहत आहे. बनावट कागदपत्रेही त्यांनी एजंटामार्फत पैसे देऊन तयार केल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. या चौघांनी देशात विविध ठिकाणी दहशतवादी कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.
या प्रकरणाचा तपास नगर तालुक्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख करीत आहेत.
हेही वाचा