स्मारकांच्या उभारणीमध्ये जुन्या-नव्या पद्धतीचा संगम करावा : उपमुख्यमंत्री | पुढारी

स्मारकांच्या उभारणीमध्ये जुन्या-नव्या पद्धतीचा संगम करावा : उपमुख्यमंत्री

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बु. आणि तुळापूर येथील स्मारकाचा विकास करताना स्मारकांच्या उभारणीमध्ये जुन्या-नव्या पद्धतीचा संगम करत मजबूत ऐतिहासिक दृश्यस्वरूपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. दरम्यान, राजगुरू यांचे राजगुरुनगर येथील स्मारकाच्या कामाचा आढावा पवार यांनी घेतला आहे. या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, चेतन तुपे, सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त रितेश कुमार, मनपा आयुक्त विक्रम कुमार, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या 269 कोटी 24 लाख रुपयांच्या पहिल्या टप्प्यातील विकासासाठी निविदा प्रक्रिया झाली आहे. या आराखड्यात 3 डी प्रोजेक्शन, मॅपिंग, होलोग्राफी, मोशन सिम्युलेशन आदी अत्याधुनिक संकल्पनांचा वापर करून महाराजांशी संबंधित ऐतिहासिक घटनांचे सादरीकरण आहे. स्मारकांच्या उभारणीमध्ये दगडी कातीव, कोरीव बांधकाम, बीड जिल्ह्यातील मातीच्या वैविध्यपूर्ण विटा आदींचा वापर करत बांधकामाला मजबुती येईल, अशा पद्धतींचा अवलंब करावा, असे पवार यांनी सांगितले.
हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकात 253 कोटींचा आराखडा असून, जन्मखोली, थोरला वाडा आदी भाग पुरातत्त्व विभागाकडून तर संग्रहालय, तालीम, वाचनालय आदी भाग सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विकसित करण्यात येणार आहे. यामध्येही अत्याधुनिक
तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. तसेच पारंपरिक बांधकाम शैलीचाही सुयोग्य वापर करावा, असेही पवार म्हणाले.

महाराष्ट्र ऑलिम्पिक भवनच्या आराखड्याचेही या वेळी सादरीकरण करण्यात आले. ऑलिम्पिक म्युझियम, क्रीडा आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन कार्यालय, तसेच व्यावसायिक वापरासाठीची कार्यालये असे भव्य आणि वैविध्यपूर्ण बांधकाम यात समाविष्ट आहे, असे या वेळी सांगण्यात आले.

हेही वाचा :

भारताची हजारो किलोमीटरची भूमी चीनच्या घशात!

Supersonic aircraft : नासा लवकरच तयार करणार सुपरसॉनिक विमान

Back to top button