अहमदनगर

Nagar : अवकाळीच्या नुकसानीपोटी मिळणार आर्थिक मदत

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने 8 हजार 571 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांबरोबर फळबागांचे नुकसान झाले. या नुकसानीचा आर्थिक फटका 15 हजार 307 शेतकर्‍यांना बसला आहे. बाधित शेतकर्‍यांना नुकसानभरपाई अदा करण्यासाठी तत्काळ पंचनामे करुन मदतीसाठी आवश्यक असणारा निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठवा, असे आदेश शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने तहसीलदारांना आदेश बजावले आहेत. पारनेरच्या तहसीलदारांनी 24 गावांतील पंचनामे करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकांची नियुक्ती केली आहे.

रविवारी जिल्ह्यात सरासरी 31.2 मि.मी. अवकाळी पाऊस झाला. गारपीट आणि वादळी वार्‍याचा पारनेर आणि अकोले तालुक्यांना अधिक फटका बसला आहे. पारनेर तालुक्यातील निघोज, पळशी महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे या तालुक्यातील 7 हजार 459 हेक्टर क्षेत्रावरील केळी, द्राक्षे, डाळिंब, पेरू, बोर, कांदा ज्वारी, टोमॅटो पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
त्याखालोखाल अकोले तालुक्यातील 60 गावांतील 927 हेक्टर क्षेत्रावरील भात आणि कापसाचे नुकसान झाले आहे. याचा आर्थिक फटका 2 हजार 910 शेतकर्‍यांना बसला आहे. याशिवाय संगमनेर तालुक्यातील 13 गावांतील 133 हेक्टर क्षेत्रावरील पिके तसेच राहाता तालुक्यातील 4 गावांतील 52 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अवकाळी पावसाने नुकसान बाधित शेतकर्‍यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी नुकसान झालेल्या शेतपिकांबरोबरच फळबागांचे तत्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. 33 टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेली पिके आणि फळबागांना तसेच मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यामुळे बाधित शेतकर्‍यांना नुकसानभरपाईपोटी किती निधी लागणार आहे. तसा प्रस्ताव तत्काळ पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी तहसीलदारांना पंचनामे करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पारनेर, अकोले, संगमनेर, राहाता तालुक्यांतील शेतपिकांचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहेत. पारनेर तालुक्यातील 24 गावांना अवकाळीचा मोठा फटका बसून शेतपिके आणि फळबागांचे अतोनात नुकसान झाले. यांचा आर्थिक फटका 12 हजार 100 शेतकर्‍यांना बसला आहे. शासनाचे आदेश मिळताच तालुक्याचे तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी पंचनामा करण्यासाठी 24 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये संबंधित गावाचे ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांचा समावेश आहे. या कर्मचार्‍यांनी युध्दपातळीवर पंचनामे सुरु केले आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT