संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा
संगमनेर तालुक्यात चालू वर्षी 3 हजार 59 हेक्टरवर उन्हाळी, तसेच 1 हजार 564 हेक्टरवर लाल सेंद्रिय कांद्याची एकूण 13 हजार 623 हेक्टरवर शेतकर्यांनी लागवड केलेली आहे. त्यामुळे यावर्षी कांद्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. कांदा पिकासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत बियाणे, खते, औषधे, यासाठी शेतकर्यांचा प्रतिएकर 40 ते 50 हजार रुपयांचा खर्च झाला आहे.
चालू वर्षी तालुक्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र त्यात कांद्याचे भाव आचनक गडगडले. त्यामुळे कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकर्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही म्हणून संगमनेर तालुक्यातील शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. या शेतकर्यांच्या व्यथा सरकारला समजणार तरी कधी, अशी चर्चा आता अडचणीमध्ये सापडलेला कांदा उत्पादक शेतकरी करू लागला आहे.
संगमनेर तालुक्यातील निमोण तळेगाव हा दुष्काळीपट्टा सोडला, तर सर्वत्रच शेतकर्यांनी अत्यंत महागड्या दराने कांद्याचे बियाणे खरेदी करून उन्हाळी आणि लाल सेंद्रिय कांदा पिकाची लागवड केली आहे.
मध्यंतरीच्या काळात कांद्याला चांगला भाव असल्यामुळे संगमनेरच्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत चालली होती. मात्र उन्हाळी आणि लाल सेंद्रिय कांद्याची अचानक मोठ्या प्रमा णात आवक वाढली असल्यामुळे कांद्याचे भाव दोन ते तीन दिवसांपासून अचानक गडगडले आहेत.
मोठ्या प्रमाणात खर्च करून सुद्धा शेतकर्याचा कांदा कवडीमोल भावाने विकू लागला तर केलेला खर्च कसा निघेल, या विवंचनेत आता कांदा उत्पादक शेतकरी असून त्याला आता मायबाप सरकारने मदत करण्याची आवश्यकता आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सध्या बाजार समितीत विक्रीला येणार्या कांद्याला प्रतिक्विंटल 200 ते 1200 रुपये, तर किलोला 8 ते 10 रुपये भाव मिळत आहे.
उत्पादनाचा खर्चही निघेना : कानवडे
कांदा पिकाला लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकर्यांना प्रति एकर साधारण 40 ते 50 हजार रुपये खर्च येत आहे. मात्र सध्याच्या भावानुसार विचार केला, तर कांदा उत्पादक शेतकर्यांचा खर्च सुद्धा निघत नाही. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी आहे त्या भावामध्ये आपल्या शेतातील कांदा विकत असल्याची खंत संगमनेर तालुक्यातील सावरचोळ येथील कांदा उत्पादक शेतकरी कारभारी रभाजी कानवडे यांनी दैनिक 'पुढारी' शी बोलताना व्यक्त केली.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.