सोन्याने भरलेली दफनभूमी! | पुढारी

सोन्याने भरलेली दफनभूमी!

लंडन ः इजिप्‍तच्या प्राचीन फेरोंच्या थडग्यांमध्ये सोन्याच्या अनेक वस्तू, अलंकार सापडलेले होते. तुतानखामेनचे थडगे त्याचे एक मोठेच उदाहरण आहे. बल्गेरियातही काळ्या समुद्राच्या तटावर अशा 294 थडग्यांचा शोध घेण्यात आला आहे ज्यामधून सोन्याच्या सुमारे 3 हजार वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत. बल्गेरियाच्या पुरातत्त्व विभागाने आपल्या अहवालात याबाबतची माहिती दिली आहे.

पुरातत्त्व संशोधकांनी अनेक थडग्यांमध्ये उत्खनन केले; पण त्यामधील 43 क्रमांकाचे थडगे सर्वात वेगळे होते. हे थडगे एखाद्या शासकाचे असावे असे दिसून येत होते. वर्ना नेक्रोपोलिस येथील या सोन्याच्या खजिन्याचा छडा सर्वप्रथम 1972 मध्ये लागला. त्यावेळी एका फॅक्टरीच्या उभारणीसाठी उत्खनन केले जात होते. 22 वर्षांचे रेचो मारिनोव्ह या ठिकाणी खोदकामाचे संचालन करीत होते. तिथे सोन्याचे अनेक अलंकार सापडले जे त्यांनी एका डब्यात भरून घरी नेले.

काही दिवसांनंतर त्यांनी हे अलंकार स्थानिक पुरातत्त्व संशोधकांना दाखवले व संबंधित ठिकाणाविषयीची माहिती दिली. त्यानंतर याठिकाणी पुरातत्त्व संशोधकांकडून उत्खनन सुरू झाले व आतापर्यंत 294 कबरींचा शोध घेण्यात आला. शेकडो वर्षांपूर्वीच्या या कबरींमधून सोन्याच्या अनेक वस्तू व अलंकार सापडले.

हेही वाचलतं का?

Back to top button