राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कांद्यावरील निर्यातशुल्क 40 टक्के वाढल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी (दि. 25) येथे नगर-मनमाड महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकर्यांनी घोषणा देत अर्धा तास रस्त्यावर ठिय्या मांडला. अनेक शेतकर्यांनी आक्रमक होत रस्त्यावर झोपून घेतले. पोलिसांशी त्यांची बाचाबाची आणि धरपकड झाली. त्यामुळे तणाव निर्माण होऊन पोलिसांनी काही शेतकरी-कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आक्रमक होत आंदोलनाचे नेतृत्व केले. ते म्हणाले, इंग्रजाच्या जुलमी राजवटीविरोधात अनेक स्वातंत्र्यसैनिकांना जीव गमवावा लागला. मात्र स्वातंत्र्यातही जुलमी शासनाच्या विरोधात लढा उभारण्याची वेळ आली आहे. आता मरण आले तरी चालेल; परंतु शेतकर्यांच्या हितासाठी आपण जुलमी शासनाविरोधात लढा देणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यलढ्यामध्ये भगतसिंग शहीद झाले. त्याप्रमाणेच आपल्यालाही शहीद व्हावे लागेल असे दिसत आहे, असेही ते म्हणाले.
आंदोलक आक्रमक झाल्याने तहसीलदार चंद्रजित रजपूत व पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि रस्ता खुला करण्यात आला. नंतर देऊन समज देऊन कार्यकर्त्यांना सोडल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रकाश देठे यांनीही शासनावर चौफेर हल्ला चढविला.
देशाने चंद्रावर यान पाठवून जगात नावलौकिक मिळविला. चांद्रयानाचे श्रेय घेऊन आकाशात गेलेल्या राजकीय नेत्यांनी जमिनीवरील शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले. आप्पासाहेब ढूस म्हणाले, की आपल्या शेजारील बांगलादेशाने सात देशांकडून शेतमाल आयातीचे धोरण आखले. यामधून भारताला मात्र वगळले. आपला विदेशी ग्राहक तुटत असतानाही आपल्या देशातील राज्यकर्त्यांना घेणे देणे नाही. व्यापार्यांचे भले व शेतकर्यांचे वाटोळे ही नीती घातक असून भारताने निर्यात धोरण बदलण्याची मागणी ढूस यांनी केली. जुलग गोसावी, बाळासाहेब जाधव यांनीही मनोगत व्यक्त करीत शासनावर टीका केली.
आंदोलनात बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, दीपक तनपुरे, खंडू केदारी, ज्ञानेश्वर बाचकर, नानासाहेब गाडे, पोपट सूर्यवंशी, अतुल वराळे, गणेश वराळे, दिनेश वराळे, रमेश कोहकडे, रवींद्र निमसे, गणेश शिंदे, जालिंदर गाडे, कांतीराम वराळे, किशोर कोहकडे, नीलेश जगधने आदी सहभागी झाले होते.
आंदोलन सुरू असताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूरध्वनीद्वारे आंदोलकांशी संवाद साधला. शासनाने व्यापार्यांवर दबाव टाकून कांदा दर कमी करत शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. या शासनाला जेरीस आणू, कांदा रस्त्यावर फेकला, तेव्हा शासनाला पाझर फुटला नाही. परंतु शेतकर्यांना दोन पैसे मिळत असल्याचे पाहून शासनाने मस्ती दाखवून दिली आहे. ही मस्ती जिरवण्याचे काम शेतकरी संघटना करणार असल्याचे शेट्टी यांनी या वेळी सांगितले.
हेही वाचा