अहमदनगर

कोपरगावमध्ये पुढील आठवड्यापासून अतिक्रमण मोहीम राबविण्यात येणार

अमृता चौगुले

कोपरगाव : पुढारी वृतसेवा

शहरात पुढील आठवड्यापासून अतिक्रमण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी दिली. नगर पथ विक्रेता समिती बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात मुख्य रस्ता धारणगाव रोड, इंदिरा गांधी नगर रोड बस स्थानक परिसर, श्री गो विद्यालय रोडवर वाहतुकीच्या ठिकाणी जवळपास तीनशेच्यावर विविध अतिक्रमणे झाली आहेत.या अतिक्रमणाबाबत सर्वे झाला असून आत्तापर्यंत 165 जणांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र सध्या पोलीस संख्याबळ मिळत नसल्याने ही मोहीम पुढे ढकलली जात आहे. पुढील आठवड्यात ही अतिक्रमण मोहीम निश्‍चितपणे राबवण्यात येईल, असे नगररचना सहाय्यक नितेश मिरीकर यांनी सांगितले.

कोपरगाव नगर पथविक्रेता समिती बैठक शहर पोलीस ठाण्याच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये शहरामधील पथ विक्रेत्यांना त्यांची शैक्षणिक पात्रता, मर्यादित कौशल्य व आर्थिक पत यामुळे व्यवसायाच्या संधी कमी उपलब्ध असतात. असंघटीत आणि स्वयंरोजगार करणाऱ्या पथ विक्रेत्यांना व्यवसायाच्या व्यापक संधी उपलब्ध करुन देणे, त्यांना कार्यकुशल बनविणे, त्यांना पत मिळविण्यास समर्थ बनविणे तसेच त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची सामाजिक सुरक्षितता, सामाजिक कल्याण व शासकीय योजनांशी सांगड घालून त्याचे जीवनमान उंचावणे हे फेरीवाला धोरणाचे उद्दिष्ट आहे. पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी व त्यांच्या विक्रीचे विनियोजन करण्यासाठी शहरामधील विविध शासकीय कार्यालये, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, विकास प्राधिकरण, सार्वजनिक आरोग्य विभाग, नगर रचना कर्यालय, पोलिस विभाग, जमीन व महसूल विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालय समन्वयाने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ नुसार नगर पथ विक्रेता समिती गठीत करणेबाबत सूचित करण्यात आले होते. या अनुषंगाने नगरपरिषद हद्दीत पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण लवकर केले जाईल असे सांगितले. यावेळी बैठकीस उपस्थित पथ विक्रेते प्रतिनिधी यांनी आपल्या अडचणी मांडून विक्री प्रक्षेत्र ठरवण्यासाठी पर्याय सुचवले. त्याच प्रमाणे आम्हाला विक्री प्रक्षेत्र ठरून दिल्यास आम्ही तेथील स्वच्छता राखू, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करू असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

या बैठकीसाठी नगरपरिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना –राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कक्षाचे शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट, रामनाथ जाधव, स्वच्छता व आरोग्य विभागचे सुनील आरण, राजेंद्र तुजारे, कवलजीत लोट, प्रवीण पोटे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT