अहमदनगर

अहमदनगर : बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर

अमृता चौगुले

मढी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : वृद्धेश्वरमध्ये तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त हजारो भाविकांनी स्वयंभू शिवपिंडीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. 'बंम बंम भोले', 'ओम नमो शिवाय'चा गजर करीत वृद्धेश्वर मंदिरात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती दूर कर, बळीराजावर आलेले संकट दूर करून भरपूर पाऊस पडू दे, असे भाविकांनी वृद्धेश्वराला साकडे घातले. पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पिके सुकायला लागली आहेत. पाणीटंचाईचे ढग घोंगावत आहेत. त्यामुळे तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त वृद्धेश्वरला येणारे भाविक पावसासाठी साकडे घालताना पाहायला मिळाले.

वृद्धेश्वर येथे तिसरा श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते. नाथपंथाचे उगमस्थान म्हणून येथे भाविकांची वर्षभर वर्दळ असते. श्रावण महिन्यात राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने येतात. दुपारी बारा वाजेपर्यंत दर्शनासाठी फारशी गर्दी नव्हती. त्यानंतर मात्र संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला. दुपार नंतर वाढलेली गर्दी रात्री उशिरापर्यंत वाढत राहिली. ग्रामीण भागातून पायी येणार्‍या महिलांची संख्या लक्षणीय होती. 'हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे'च्या गजरात महिलांनी विविध स्वयंरचित भजने गाऊन पावसाठी वृद्धेश्वराला साकडे घातले.

वृद्धेश्वरकडेे येणार्‍या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने, भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. देवस्थान समितीने दर्शन रांगेचे योग्य नियोजन केल्याने एकत्र गर्दी झाली नाही. उन्हाचा चटका बसू नये, यासाठी दर्शन रांगेत कापडी शेडनेटची सावली तयार करण्यात आली होती. त्यामुळे भाविक वृद्धेश्वराच्या भक्तीत तल्लीन असल्याचे चित्र दिसून आले.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, देवस्थान समितीचे अध्यक्ष गणेश पालवे यांच्या उपस्थितीत वेदमंत्रोच्चरात महापूजा झाली. घाटशिरस ग्रामस्थ व भाविकांनी पैठण येथून आणलेल्या कावडीच्या पाण्याने स्वयंभू शिवपिंडीला जलाभिषेक करण्यात आला. महाकाल ग्रुप, चालक-मालक मित्र मंडळ व देवस्थान समितीतर्फे विविध भाविकांच्या योगदानातून सर्व भाविकांना दिवसभर महाप्रसाद सुरू होता. दिवसभरात सुमारे तीन टन केळीचे वाटप करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे व दीपक महाराज यांनी दिली. देवस्थान समिती व कर्मचारी चालक मालक संघटना, युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

एसटी बंदमुळे भाविकांची गैरसोय

मराठा समाजाचे राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू असल्याने एसटी महामंडळाने बस बंद ठेवल्या आहेत. त्याचा परिणाम यावर्षी भाविकांच्या गैरसोयीतून दिसून आला. त्यामुळे खासगी वाहनांची मोठी रिघ वृद्धेश्वरच्या दिशेने लागलेली होती. वृद्धेश्वर देवस्थान व पोलिसांनी पार्किंगची व्यवस्था केली होती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT