अहमदनगर

Nagar Ganeshotsav 2023 : भिंगारच्या गणेश विसर्जनाला वर्षाभिषेक

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत ढोल ताशांच्या आणि डीजेच्या गाण्यांवर थिरकत भिंगार शहरातील गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पावसाची रिमझिम सुरू असतानाही त्यात चिंब होत डीजे अन् डॉल्बीच्या तालावर नाचत भक्तांनी बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आर्जव केले. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते.

भिंगारमधील गणपती विसर्जन मिरवणूक प्रथेप्रमाणे आठव्या दिवशी काढली जाते. भिंगारमधील ब्राह्मणगल्लीतील मानाच्या देशमुख गणपतीची पूजा मंगळवारी दुपारी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते होऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला. या वेळी समीर देशमुख, कार्तिक देशमुख, आशू देशमुख, प्रज्वल देशमुख, अक्षय देशपांडे, स्वप्नील मुळे, शिवाजी राऊत, अनिल भोसले, संजय सपकाळ, सोपान साळुंखे, श्याम वागस्कर, सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे आदी उपस्थित होते. आरतीनंतर पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. पोलिस अधीक्षक ओला यांनी पालखीला खांदा देत मिरवणुकीस प्रारंभ केला. त्यानंतर सार्वजनिक 13 गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सायंकाळी पाच वाजता प्रारंभ झाला. ब्राह्मण गल्ली, भिंगार वेस, घासगल्ली, गवळीवाडा, सदरबाजार, भिंगार अर्बन बँक, दाणेगल्ली, मोमीनगल्ली या मार्गाने मिरवणूक मार्गस्थ झाली. सुमारे 100 पोलिस अंमलदार, एक एसआरपीएफ प्लाटून, एक आरसीपी प्लाटून असा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

डीजेच्या आवाजाचा अतिरेक
मिरवणुकीत लावण्यात येणार्‍या डीजेंना आवाजाची मर्यादा पाळण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाने मंडळांच्या पदाधिकार्‍यांना वारंवार देऊनही त्याचे कोणत्याच मिरवणुकीत पालन होताना दिसत नाही. भिंगारमधील मिरवणुकीतसुद्धा डीजेच्या आवाजाचा अतिरेक झाल्याचे दिसून आले. पोलिस प्रशासनाकडून डीजेच्या आवाजाची तीव्रता मोजण्यात आली असून, संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. बुधवारी कारवाई होणार असल्याचे समजते.

मिरवणुकीवर सीसीटीव्हीचा वॉच
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सणोत्सवाच्या काळात निघणार्‍या मिरवणुकांवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. भिंगारमधील गणेश विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. या माध्यमातून प्रत्येक घडामोडीवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT