अहमदनगर

बारामती-अमरापूर रस्त्याने जाताना त्यांना आमचा विकास दिसत नाही का? : आमदार प्रा. राम शिंदे

अमृता चौगुले

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : बारामती-अमरापूर रस्त्याने आरामात जाताना रोहित पवारांना, मी विकास केला की, नाही हे लक्षात येत, असेल अशी टीका आमदार राम शिंदे यांनी केली. खांडवी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व संचालकांचा नागरीसत्कार व विकास कामांचे उद्घाटन आमदार राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, सभापती काकासाहेब तापकीर, प्रवीण घुले, अशोक खेडकर, सचिन पोटरे, उपसभापती आबासाहेब पाटील, नंदराम नवले, प्रवीण तापकीर, दादासाहेब सोनमाळी, मंगेश जगताप, विक्रम राजेभोसले, विनोद दळवी, काकासाहेब धांडे, शेखर खरमरे, पप्पू धोदाड, अनिल गदादे आदी उपस्थित होते.

आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, 'मी काय विकास केला हा प्रश्न उपस्थित करणार्‍या आमदारांना सांगा ज्या परिसरात कार्यक्रम आहे तिथे वैद्यकीय दवाखाना बांधला, तिथे कर्मचारी तुम्हाला देता आले नाही, ज्या परिसरात हा कार्यक्रम होत आहे, तिथे रुपयाही दिला नाही. शेतकर्‍यांसाठी रस्ते, पाणी, वीज, सिंचनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाले. आपल्या काळात तीन वर्षे कुकडीचे पाणी शेतकर्‍यांना मिळाले नाही. कर्जत-जामखेड पंचायत समितीच्या इमारती, दोन्हीही पोलिस ठाण्याच्या इमारती, न्यायालयाच्या इमारती, माझ्या काळात बांधल्या. नगरपंचायतला प्रशासकीय इमारतीसाठी निधी मंजूर करण्यात आला. कर्जत नगरपंचायतसाठी 156 कोटी रुपयांचा निधी दिला.

अमरापूर- बारामती रस्त्यासाठी 200 कोटींचा निधी दिला तो रस्ता आज पूर्ण झाला आहे. या रस्त्याने जाताना तरी मी केलाला विकास आमदार पवारांना दिसत असावा असा टोला आमदार शिंदे यांनी लगावला. कर्जत शहरात मागील पाच वर्षांमध्ये एकही दिवस टँकर लागला नाही. महिलांच्या डोक्यावरील हंडा मी उतरवला. मी सालकरीचा मुलगा आहे. म्हणून मला कारखाने काढता आले नाही आणि गुर्‍हाळही उभे करता आले नाही; मात्र सर्वसामान्य नागरिक शेतकर्‍यांसाठी काम केले. आपल्या तीन वर्षांच्या काळामध्ये गोरगरीब नागरिकांच्या सोसायटी होत्या त्या सोसायटीच्या जमिनीवर सरकारची नोंदी लावण्यात आल्या. यावेळी अंबादास पिसाळ काकासाहेब तापकीर सचिन पोटरे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. सूत्रसंचालन शेखर खरमरे यांनी केले.

शरद पवार भाजपसोबत आले तरी आश्चर्य वाटायला नको : शिंदे
बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंंना निवडून येण्यासाठी आमच्याकडेच यावे लागेल. अजित पवार आणि सुप्रिया सुळे आमच्याकडे आल्यामुळे बारामती मतदारसंघामधून विजय होतील. पुढील काही दिवसात शरद पवार भाजपसोबत आले तरी आश्चर्य वाटायला नको, असे आमदार शिंदे म्हणाले.

निरव मोदी लंडनमध्ये पळून गेला आहे. त्यांच्या जमिनीवर 'एमआयडीसी' करण्यासाठी खरेदी विक्री व्यवहार लंडनहून कसा करणार, त्यांनी कोणाला अधिकार दिले आहेत, हे देखील आता जनतेला उघडपणे सांगावे.
                                                                   – प्रा. राम शिंदे, आमदार

'त्या' जमिनीवरील पोटहिस्सा नेमका कोणाचा? : शिंदे
'एमआयडीसी' माळढोक परिसरामध्ये करण्यासाठी आमदार रोहित पवार आग्रह करत आहेत. त्यामध्ये निरव मोदी यांच्या जमिनीवर पोट हिस्सा नेमका कोणाचा असा प्रश्न आता विचारला जात आहे. शेतकर्‍यांच्या शेतजमिनीवरील माळढोकचे आरक्षण मी उठवले, आता देखील भोसाखिंडीतून पाणी सोडण्याचा निर्णय करून घेतला. कुकडीच्या आवर्तनासाठी तीन वाजता पत्र अन् पाच वाजता मंजुरी, आणि रात्री सात वाजता पाणी सोडण्यात आले. कोणालाही फोटोसेशनची संधी मिळाली नाही, असा टोला आमदार शिंदे यांनी आमदार पवारांना लगावला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT