अहमदनगर

राहुरी : मुळा उजव्या कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू

अमृता चौगुले

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : मित्रांसमवेत मुळा धरणाच्या उजव्या कालव्यामध्ये पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. आकाश दगडू पवार (वय 22 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. आकाश पवार मुळा धरणाच्या पायथ्याशी उजव्या कालव्यात पोहण्यास मित्रांसमवेत गेला होता. दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्याने पोहण्यास पाण्यात उडी मारली, परंतु तो गटांगळ्या घेऊ लागला. मित्रांनी आरडाओरड केली, परंतु काही क्षणातच तो पाण्यात दिसेनासा झाला.

या घटनेची माहिती समजताच जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रभाकर गाडे यांनी तत्काळ धाव घेतली. याप्रसंगी पाणबुड्यांनी पाण्यात उड्या घेत आकाशचा शोध सुरू केला. सुमारे 5 तासांच्या अथक परिश्रमानंतर आकाशचा कालव्यात शोध लागला. त्यास पाण्यातून बाहेर काढत सायंकाळी राहुरी येथे ग्रामीण रुग्णालयात नेले, परंतु त्यास मृत घोषित करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन सुरू होते.

बारागाव नांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते दगडू पवार यांचा मुलगा आकाशच्या निधनाने शोक व्यक्त करण्यात आला. मृत आकाशच्या पश्चात आई, वडिल, मोठा भाऊ, बहिण असा परिवार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुळा धरणामध्ये बुडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी गस्त घालण्याची आवश्यकता आहे.

हे ही वाचा

SCROLL FOR NEXT