अहमदनगर

कर्जत : मतदारसंघातील कामांवरील स्थगिती न्यायालयाने उठवली

अमृता चौगुले

कर्जत / जामखेड; पुढारी वृत्तसेवा : अखेर न्यायालयीन लढ्याला यश आले आहे. न्यायालयाने कर्जत-जामखेड मतदारसंघातील 20.55 कोटींच्या जलसंधारण विभागाच्या विविध कामांवरील स्थगिती उठवली आहे. 2021-22 आर्थिक वर्षातील ही कामे असून, दोन्ही तालुक्यातील मिळून 29 कामांचा समावेश आहे. त्यामुळे स्थगिती उठल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या नंतर सरकारने तत्काळ राज्यातील विविध विकासकामांवर स्थगिती लावण्याचे सत्र सुरू केले होते. यातच कर्जत-जामखेड मतदारसंघातील कोट्यवधींची विकास कामांना स्थगिती दिली होती. यामुळे ही कामे रखडली होती. अशातच स्थगिती उठवावी म्हणून वेळोवेळी अधिकारी व मंत्र्यांच्या आमदार रोहित पवारांनी भेटी घेऊन देखील त्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नव्हता.

यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील नागरिक व पदाधिकार्‍यांनी आमदार पवारांच्या नेतृत्वाखाली न्यायालयात धाव घेतली आणि याबाबत स्थगिती उठवावी यासाठी याचिका दाखल केली होती. पूर्वी काही कामांची स्थगिती ही न्यायालयाच्या आदेशानंतर उठवण्यात आली होती. परंतु, मतदारसंघातील जलसंधारण विभागाच्या विविध 20.55 कोटी रुपयांच्या कामाची स्थगिती मात्र तशीच होती. आता, त्याही कामाची स्थगिती उठली आहे. स्थगिती न्यायालयाने उठवल्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील एकूण 25 गावातील शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे.

परंतु, हेच काम वर्षभरापूर्वी झाले असते तर पाणी अडवता आले असते आणि दुष्काळाशी झुंजणार्‍या शेतकर्‍यांना याचा फायदा झाला असता. कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व इतरही बंधार्‍याशी संबंधित जलसंधारण विभागाची 20.55 कोटी रुपयांची कामे आता मार्गी लागणार असल्याने जनसामान्यांच्या लढ्याला यश आल्याचे या माध्यमातून पाहायला मिळते. शिवाय आमदार रोहित पवारांनी वेळोवेळी केलेल्या प्रयत्नांमुळे या कोट्यवधींच्या कामांवरील स्थगिती उठविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

'अधिकार्‍यांपासून मंत्र्यांपर्यंत भेटी घेतल्या'

मतदारसंघातील विकास कामे मार्गी लागावी यासाठी मी अधिकार्‍यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांच्याच वेळोवेळी भेटी घेऊन चर्चा व पाठपुरावा केला. परंतु, वेळोवेळी मागणी करूनही माझ्या मतदारसंघातील कोट्यवधींच्या विकास कामांवरील स्थगिती उठवण्याबाबत शासन उदासीन असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिक आणि आम्ही सर्व जण एकत्र येत न्यायालयाचे दार ठोठावून न्याय मागीतला आणि तो न्याय आता आम्हाला मिळाला, याचे समाधान वाटते, अशी खंत रोहित पवारांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT