अहमदनगर

नेवासा : पीक विम्यात कपाशी, सोयाबीनची मुसंडी!

अमृता चौगुले

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यात यंदा 90 हजार 389 शेतकर्‍यांनी 63 हजार 723 हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचा विमा उतरविला आहे. गेल्या वर्षी 23 हजार शेतकर्‍यांनी पीक विमा उतरविला होता. त्या तुलनेत यंदा 67 हजार शेतकरी वाढले असून, उसाचे आगार म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या नेवासा तालुक्यात पीक उत्पादनात कापूस व त्या खालोखाल सोयाबीन पिकाने मुसंडी मारल्याचे दिसत आहे.

मुळा, प्रवरा व जायकवाडी पश्चजल यामुळे चारही दिशांना पाटपाणी असलेल्या नेवासा तालुक्याची ओळख उसाच्या फडांचे आगार अशी आहे. तालुक्यातील मुळा व ज्ञानेश्वर या साखर कारखान्यांसह जिल्ह्यातील विखे, कोल्हे, काळे, अशोक, वृद्धेश्वर, तसेच गंगामाई, अंबालिकासह सर्वच खासगी साखर कारखाने नेवासा तालुक्यातून ऊस नेतात. यंदा मात्र कापूस, त्या खालोखाल सोयाबीन, बाजरी, तूर, मका ही पिके शेतकर्‍यांनी घेतली असल्याचे पीक विम्यातून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी सततच्या पावसाने ऊस पिकाला दर एकरी उत्पादन व साखर उतार्‍यात झटका दिल्याने शेतकरी उसाकडे पाठ फिरवित अन्य पिकाकडे वळल्याचे दिसत आहे.

नेवासा तालुक्यात यंदाच्या पीक पेरणी अहवालात नेवासा मंडळात 11 हजार 762, सलाबतपूर मंडळात 9 हजार 171, कुकाणा मंडळात 9 हजार 327, तर घोडेगाव मंडळात 15 हजार 66, अशा एकूण 45 हजार 329 हेक्टरमध्ये कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मूग, भुईमूग, उडीद व भाजीपाला पिके घेतली आहेत. पीक विम्यात तालुक्यात सर्वाधिक विमा 49 हजार 170 शेतकर्‍यांनी कापूस या पिकावर 34 हजार 312 हेक्टरसाठी घेतला आहे.

योजना फायदेशीर ठरणारी : ढगे

प्रधानमंत्री पीक विमा योजना एक रूपयात केल्याने शेतकरी सहभाग वाढला. महसूल, कृषी विभागाने त्यासाठी जनजागृती केली. तसेच आग, अतिवृष्टी, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी पिकांच्या नुकसानीचा परतावा म्हणून ही योजना फायदेशीर ठरणारी असून, विमा संरक्षित क्षेत्र करण्यात आले आहे, असे कृषी तज्ज्ञ डॉ. अशोक ढगे यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT