अहमदनगर जिल्ह्यातील जलजीवनच्या 225 योजनांची यशस्वी चाचणी

अहमदनगर जिल्ह्यातील जलजीवनच्या 225 योजनांची यशस्वी चाचणी

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जलजीवन योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागणार असून, काल स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला यातील 225 योजनांची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील अनेक गावांत, वाड्या वस्त्यांवर स्वातंत्र्यांनतर 75 वर्षाने प्रथमच नळ योजना आल्याने स्थानिक अबालवृद्धांसह चिमुरड्यांच्या चेहर्‍यावर उमललेले हास्य शासनाच्या योजनेचे यश आल्याचे दिसले. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी स्वतः या योजनांची चाचणीचा आढावा घेतल्याचेही समजले.

केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे मार्फत नगर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजना राबविली जात आहे. अतिदुर्गम, दुष्काळी तसेच वाड्यावस्त्यांना प्रति माणसी 55 लिटर प्रतिदिन शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.जिल्हा परिषदेतून 927 गावांसाठी 829 योजनांची कामे घेण्यात आलेली आहे.

यातील अनेक बहुतांशी कामे प्रगतीपथावर आहेत. काही योजनांसाठी जागांच्या अडचणी होत्या. मात्र सीईओ येरेकर यांच्या मार्गदर्शनात पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या प्रयत्नातून जागांचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. यामुळे या ठिकाणी योजनांच्या कामांना गती आल्याचे पहायला मिळाले आहे.

दरम्यान, 15 ऑगस्टच्या पुर्वसंध्येला 829 मधील सुमारे 225 योजनांची यशस्वी चाचणी करण्यात आली असून, या योजनांव्दारे संबंधित गावांतील ग्रासस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. पुढील काळात संबंधित योजनांची किरकोळ उवर्रीत कामे पूर्ण करून लोकप्रतिनिधींच्या हस्ते या योजना कार्यान्वित होणार आहेत.

या 225 योजनांच्या माध्यमातून 240 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. यातील बहुतांशी गावांना स्वातंत्र्यानंतर प्रथमच नळाव्दारे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. जलजीवन योजनेमध्ये 'हर घर जल' पाणी पोहचविण्याचे उदिद्ष्टे आहे. लवकरच डिसेंबर 2023 अखेर सर्व योजना पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, त्या दिशेने जिल्हा परिषद प्रशासनाचा पाठपुरावा सुरू असल्याने लवकरच सर्व योजना पूर्ण होणार असल्याचे संकेत आहेत.

नळाव्दारे पाणी आले; ती गावे टॅँकरमुक्त झाले..!

जलजीवन या महत्वकांक्षी योजनेमुळे बहुतांशी गावे टँकरमुक्त होणार आहेत. काल चाचणी झालेल्या योजनांपैकी संगमनेर तालुक्यातील मुधोळवाडी, आणि कर्जत तालुक्यातील नवसारवाडी, औटेवाडी, नेटकेवाडी ही गावे टँकरमुक्त झाली आहेत. योजनांव्दारे आता थेट घरासमोर नळ आल्याने येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

नागरिकांच्या सूचनांची दखल घेणार

जिल्ह्यात 225 योजनांची यशस्वी चाचणी झाल्याने समाधान असून, शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील योजनांची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन काम करत आहे. तरीही या बाबत नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्याबाबत दखल घेवून कार्यवाही केली जाईल, असेही सीईओ येरेकर यांनी आवाहन केले

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news