शशिकांत पवार :
नगर तालुका : गेल्या काही दिवसांपासून देशात, तसेच राज्यात जातीयवादामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचे लोण नगर जिल्ह्यात येऊन पोहोचले असल्याचे शेवगाव, संगमनेर, पारनेर, जामखेड येथील घडलेल्या घटनांवरून दिसून येते. जातीयवादाच्या झळा नगर तालुक्यात देखील जाणवत असून, सोशल मीडियावर तरूण वर्ग आक्रमक झालेला दिसून येत आहे. सोशल मीडिया वॉरच्या धगधगणार्या झळांमध्ये आगीची ठिणगी पडून भडका उडणार नाही, यासाठी प्रशासनाने अॅक्शन मोडवर येण्याची गरज निर्माण झाली आहे. नगर तालुक्यातील ग्रामीण भाग शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो.
परंतु, सध्या फार वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जेऊर, गजराजनगरसारख्या ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे तालुक्यातील तरूणवर्ग सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रमक झाल्याचे दिसून येते. नगर शहरात औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचणार्यांचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला अन् तणावात आणखीनच भर पडली. तोच व्हिडिओ काही तरूणांनी स्टेटस, तसेच इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर टाकल्याने हिंदू संघटनांनी आक्रमक होत, त्या घटनेचा निषेध नोंदविला. ठिकठिकाणी बंद पुकारून आरोपींवर कारवाईची मागणी केली. तालुक्यात मागे झेंडा वादाचे प्रकरणही चांगलेच गाजले होते.
जेऊरसारख्या ग्रामीण भागात देखील औरंगजेबाचे सोशल मीडिया वरून उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा प्रवृत्तींविरोधात पोलिसांनी कारवाई केली. परंतु त्यांचा कायमचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. अशा प्रवृत्तींविरोधातील कारवाई जुजबी ठरत असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. जेऊर येथील बायजामाता यात्रोत्सवात झालेल्या दगडफेकीत यात्रेकरू महिला, लहान मुले जखमी झाले होते. अशा धार्मिक कार्यक्रमात होणार्या दगडफेकीचा विविध ठिकाणी निषेध नोंदविण्यात आला. जातीयवादाचे लोण ग्रामीण भागातील गावागावांत पोहोचल्याने भविष्यात प्रशासनासाठी ही बाब डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे यावर वेळीच आवर घालण्याची गरज आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तरूण आक्रमक होऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकताना दिसून येतात. त्यातूनच वाद, तणाव निर्माण होत आहे. हे सोशल मीडिया वॉर ग्रामीण भागात देखील दिसून येत आहे. यामुळे जातीयवादाला खतपाणी घालण्याचेच काम होत आहे. नगर तालुक्यावर जातीय वादाच्या घोंगावणार्या वादळाला वेळीच थोपविणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाने अॅक्शन घेण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
योग्य वेळी बंदोबस्त होणे गरजेचे
अठरापगड जाती गुण्यागोविंदाने नांदणार्या ग्रामीण भागात जातीयवादाचे लोण पोहोचणे, हे गाव तसेच समाजासाठी दुर्दैवी बाब आहे. ग्रामीण भागात दोन गटांत सुरू असलेली धुसफूस निश्चितच गावासाठी घातक ठरू शकते. भविष्यात यातून वाद उद्भवू नयेत, यासाठी याचा योग्य वेळी बंदोबस्त होणे गरजेचे आहे.
हे ही वाचा :