अहमदनगर

दिव्यांगांच्या आरक्षणास केंद्र संवेदनशील : केंद्रीय राज्यमंत्री आठवले

अमृता चौगुले

आश्वी/लोणी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशाला पुढे घेवून जाण्याचे काम करीत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक न्याय देण्याची भूमिका केंद्र सरकार घेत आहे, असे सांगत सुगम्य भारत अभियानाच्या माध्यमातून विकासाची प्रक्रीया पुढे घेवून जाण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्द असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले. दरम्यान, भविष्यात दिव्यांगाच्या आरक्षणाबाबत सरकार संवेदनशिल असल्याचे मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय अधिकारीता मंत्रालय व सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून खा. डॉ. सुजय विखे पा. यांच्या माध्यमातून 1 हजारांहून अधिक दिव्यांग व्यक्तिंना मंजुर झालेल्या साधन साहित्याचे मोफत वितरण मंत्री आठवले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी खा. डॉ. सुजय विखे पा., खा. सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवडे, डॉ. अभिजित दिवटे, विजयराव वाकचौरे, बाळासाहेब गायकवाड, श्रीकांत भालेराव, सुरेंद्र थोरात, प्रकाश लोंढे, पप्पू बनसोडे, आशिष शेळके, भिमा बागुल, चांगदेव जगताप, चद्रकांत सरोदे, राजेंद्र गवांदे उपस्थित होते.

मंत्री आठवले म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सुगम्य भारत अभियान सुरु करण्यात आले आहे. यात आता 21 श्रेणी निर्माण करण्यात आल्या. या माध्यमातून दिव्यांगांना न्याय मिळवून देताना देशात 1, 314 सरकारी भवन सुगम्य बनविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. 35 आंतरराष्ट्रीय विमान तळ, 709 रेल्वे स्टेशन, 614 वेबसाईट, 19 वृत्त चॅनल तसेच 8 लाख शाळा सर्व सुविधांनी परिपुर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

राज्यात आमच्या विभागाने समाज घटकांच्या उन्नतीसाठी 2 लाख 44 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. आत्तापर्यंत राज्यात 5,993 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीस सहकार्य केल्याचे मंत्री यांनी सांगितले. राज्यात जिल्हा पुर्नवसन केंद्र व कौशल्य विकास योजनेकरीता केंद्राने निधी उपलब्ध करुन दिल्याचे स्पष्ट करुन, मंत्री आठवले म्हणाले, यु.डी.आय.ए योजनेतून 17 लाख दिव्यांग व्यक्तिंना कार्डचे वितरण करण्यात आले.

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा ही भूमिका केंद्र सरकारची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग व्यक्तिंकरीता सतत सहकार्याची भूमिका घेतली. त्यांचे सक्षम नेतृत्व देशाला पुढे घेवून जात आहे. केंद्राच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक न्यायाचे काम होत असल्याचे मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले.

खा. डॉ. सुजय विखे पा. म्हणाले, विखे पा. कुटूंबियांनी दीव्यांग व्यक्तिंच्या विकासाकरीता सातत्याने पुढाकार घेतला. केंद्र सरकारच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली. भविष्यात दिव्यांग व्यक्तिंना डोल उपलब्ध करुन देण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. या व्यक्तिंना नोकर्‍यांमध्ये आरक्षणसुध्दा असावे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी दिली.
खा. सदाशिव लोखंडे यांनी केंद्र सरकारच्या योजनेचे कौतुक करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वंचितांना न्याय मिळवून देण्याचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यांगांची 'त्यांना' आठवण झाली नाही..!
यापुर्वी ज्येष्ठ नागरीकांसाठी वयोश्री व आता दिव्यांग व्यक्तिंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली पालकत्वाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आजपर्यंत समाजात या घटकांचा कोणीही विचार केला नव्हता. जिल्ह्यातही या योजनेची अंमलबजावणी प्राधान्याने आपण केली. अनेकजण कित्येक वर्षे सत्तेत राहिले, परंतु दिव्यांगांची त्यांना आवठण झाली नसल्याची टीका खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी विरोधकांवर नाव न घेता केली.

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT