अहमदनगर

कर्करोगाचे दीड हजार रुग्ण; महिला, तरुणांनाही लागले व्यसन

अमृता चौगुले

पोपट सांगळे / रोहिणी पवार

नगर : तंबाखूचे सेवन करणार्‍या लोकांना तंबाखूमुक्त करून तंबाखूचे आरोग्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी जनजागृती म्हणून दरवर्षी 31 मे हा दिवस संपूर्ण जगभर 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' म्हणून साजरा केला जात असताना दैनिक पुढारीच्या हाती जिल्ह्यातील तंबाखुमुळे कर्करोगाला बळी पडलेल्यांची धक्कादायक आकडेवारी हाती आली आहे.

विशेष म्हणजे यामध्ये महिला आणि युवकांबरोबरच अल्पवयीन मुलांचे प्रमाण मोठे आहे. नगर जिल्ह्यात आज अखेर तंबाखूमुळे कर्करोग झालेल्यांचा आकडा सुमारे दीड हजारावर पोहोचला आहे. तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडणारांचे प्रमाण दिवसें दिवस वाढत आहे. तंबाखूमध्ये निकोटीनसह 42 प्रकारचे विषारी घटक असतात, त्यामुळे शरिराची प्रतिकारशक्ती कमी होऊन कॅन्सरसह विविध आजारांनी निमंत्रण दिले जाते.

जिल्हा शासकीय रुग्णालयाअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तंबाखू निवारण समिती कार्यरत असून जिल्हा शल्यचिकित्सक तिचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतात. तंबाखूचे व्यसन असणार्‍यांनी वर्षातून एकदा, तरी व्यसन नसणार्‍यांनी 5 वर्षांतून एकदा निदान करून घेण्याबाबत आवाहन करण्यात येते, तसेच पानटपरी, रिक्षावाले, हमाल, छोटे हॉटेल व्यावयायिक, कंपनी कामगार यांच्याशी गटचर्चा करून तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती दिली जाते.

शाळांच्या बाहेर रस्त्यांवर दोन पिवळया पट्टया लावून तंबाखू , धुम्रपान प्रतिबंधीत क्षेत्र असे फलक लावले जातात. चालू वर्षी 2021-22 या वर्षांत 141 शाळा व गत 4 वर्षांत जिल्हाभरातील 570 शाळा तंबाखूमुक्त केल्याची माहिती समितीचे जिल्हा सल्लागार डॉ. हर्षल पठारे यांनी दिली.

जिल्ह्यातील कर्करोगाचे वास्तव

तंबाखू निवारण समितीच्या कागदोपत्री 41 पुरुष व 23 महिला कर्करोगग्रस्त असले, तरी वास्तव त्यापेक्षा वेगळे आहे. सद्य स्थितीत आरोग्य मानकानुसार 1 लाखांमागे 97 रुग्ण हे कर्करोगाचे असून नगर जिल्ह्याची लोकसंख्या सद्या 50 लाखावर आहे. त्याप्रमाणे 4850 रुग्ण सर्व प्रकारच्या कर्करोगाचे आहेत. त्यात तंबाखुमुळे 30 टक्के हे एकटया तंबाखू सेवनाचे म्हणजेच 14 55 एवढे रुग्ण आहेत. यापैकी 716 जण चाचणीत निष्पन्न झाले आहेत. याशिवाय पुणे, मुंबई आदी ठिकाणी खाजगी दावाखान्यांमधून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्याला तंबाखूच्या कर्करोगाचा विळखा पडला आहे.

अन्न प्रशासनाच्या कारवायांचा देखावा

राज्यात गुटखा बंदी असल्याने माव्याला सोन्याचे दिवस आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खुलेआमपणे मावा विक्री होत सुरू आहे. त्यात अन्न व औषध प्रशासनाने गेल्या वर्षभरामध्ये अवघ्या 24 सुगंधीत तंबाखू व मावा विक्रेत्यांविरोधात कारवाई करून 14 हजार 971 पाकिटे जप्त केली. एकूण 17 लाख 45 हजार 183 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला म्हणजे कारवाईचा केवळ देखावा केला आहे.

भारतात आढळणार्‍या एकूण कर्करुग्णांमध्ये 30 टक्के मुखाचा, तसेच फुफ्फुसांचा कर्करोग झालेले असतात. तंबाखूवर नियंत्रण मिळविण्यास मदत करणारे वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. धूम्रपानाची सवय मोडणे कठीण असले, तरी ते शक्य आहे.

                                              -डॉ. प्रकाश गरूड, कॅन्सर सर्जन.

पूर्वी 18 -20 वयोगटातील तरूण तंबाखू खायचे आज मात्र 10-12 वयोगटातील मुले आहारी गेलेत. 100 ग्रॅम ओवा, 100 ग्रॅम बडीशेप तव्यावर तापून अर्धे लिंबू पिळून ते मिश्रण महिनाभर खावे. तंबाखूची इच्छा कमी होईल.

                                  -भाऊसाहेब येवले, प्रमुख- मातृभूमी व्यसन निर्मूलन संस्था.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT