झेडपीला ‘पंचायत राज’ची धास्ती; 25 ते 28 आमदारांची समिती 23 जूनला नगरला येणार?

झेडपीला ‘पंचायत राज’ची धास्ती; 25 ते 28 आमदारांची समिती 23 जूनला नगरला येणार?

नगर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामांचे मूल्यमापन करण्यासाठी विधिमंडळाची पंचायत राज समिती लवकरच नगरमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान, समितीचा दौरा अधिकृतरित्या निश्चित झालेला नसला, तरी साधारणतः 23 ते 27 जूनदरम्यान ही समिती नगरला येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

पंचायत राज समितीमध्ये आमदारांचा समावेश असतो. ही समिती जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या कामांचे मूल्यमापन करत असते. त्यामुळे या समितीचा झेडपीतील अधिकारी नेहमीच धसका घेत असतात. यावेळीही दौरा जाहीर होण्यापूर्वीच अनेक जण धास्तावलेले आहेत.

जिल्ह्यातील पंचायत समित्या, आरोग्य केंद्रे, शाळा, ग्रामपंचायतींना समिती भेटी देणार आहे. जिल्हा परिषदेच्याही बांधकाम, जलजीवन, ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य इत्यादी विभागाच्या कामकाजाची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे कामकाजात काही त्रुटी राहू नयेत, यासाठी अधिकार्‍यांच्या बैठकांनाही वेग आलेला दिसणार आहे

. तसेच समिती पथक आल्यानंतर त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था, बैठकीची व्यवस्था, चहापानाची व्यवस्था करण्यासाठी यंत्रणेमार्फत 'नियोजन' केले जाणार आहे. यासाठी अनुभवी कर्मचार्‍यांवर 'ती' जबाबदारी दिली जाणार आहे. दरम्यान, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यातही 26 ते 28 मे दरम्यान पंचायत राजचा दौरा होता. मात्र, तो काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आलेला आहे.

त्यामुळे नगरचा दौराही पुढे जाणार का? याकडे अधिकार्‍यांचे लक्ष आहे. पंचायत राज दौर्‍याबाबत सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी संबंधित समितीचा दौरा होणार आहे. मात्र तो अद्याप निश्चित झाला नाही, अशी माहिती दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news