अहमदनगर

राहुरी : बारागाव नांदूर ग्रामपंचायतीचा बिगुल वाजला

अमृता चौगुले

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात राजकीय दृष्ट्या सर्वाधिक लक्षवेधी ठरणार्‍या बारागाव नांदूर ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला. प्रशासनाने बारागाव नांदूरमध्ये निवडणुकीचे पहिले पाऊल टाकताना बैठक घेत लोकनियुक्त सरपंच व 17 सदस्य निवडीसाठी आरक्षण सोडत जाहिर करण्यात आले. राहुरीच्या राजकारणाला दिशा देणारे गाव म्हणून बारागाव नांदूरच्या राजकीय घडामोडीकडे पाहिले जाते. पंधरा वर्षांपासून गावामध्ये स्व. शिवाजीराजे गाडे व स्व. बापुराव गाडे या दोन दिवंगत नेत्यांमधील राजकीय संघर्ष चर्चेचा विषय ठरत होता. परंतु दोन्ही मातब्बर नेत्यांनी निरोप घेतल्यानंतर बारागाव नांदूरच्या राजकारणात अमुलाग्र बदल झाला.

गावातील दोन्ही गट आ. प्राजक्त तनपुरे यांना मानणारे आहेत. तर भाजपचा एक गट सद्यस्थितीला प्रभाकर गाडे यांच्या समवेत राजकीय सत्तेत सहभागी आहे. गावच्या राजकारणामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य हे प्रभाकर गाडे गटाचे आहेत. तर लोकनियुक्त सरपंच सुरेखा देशमुख या स्व. शिवाजी गाडे यांच्या गटाच्या आहेत.

सेवा संस्थेमध्ये स्व. शिवाजी गाडे यांची सत्ता तर मुळाखोरे खोलेश्वन दूध संस्थेमध्ये प्रभाकर गाडे गटाची सत्ता आहे. स्व. शिवाजी गाडे गटाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांच्यासह विश्वास पवार सांभाळत आहे. राजकीय गट वेगळे असले तरीही गावामध्ये मैत्रीपूर्ण राजकारणातून सत्ता सांभाळण्याचे काम दोन्ही गटाकडून सुरू आहे.

मात्र, ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याच गटाला हवी अशी अपेक्षा बाळगत दोन्ही गट पुन्हा सक्रिय झाले आहे. तिसर्‍या गटाचा उदय होईल अश्या गुप्त चर्चाही जोर धरत आहे. त्यामुळे बारागाव नांदूरच्या राजकारणात नेमके काय होईल? हे सांगता येत नसले, तरीही इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला जोर लावला आहे. मतदारांच्या गाठीभेटसह इच्छुकांनी प्रचाराला सुरू केल्याचे दिसून येत आहे.

गावातील तंटामुक्त समितीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये मंडळाधिकारी वैशाली सोनवणे, तलाठी परते व ग्रामविकास अधिकारी गोसावी यांच्या मार्गदर्शनात आरक्षण सोडत जाहिर झाली. याप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे प्रभाकर गाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी गाडे, विश्वास पवार, सेवा संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र गाडे, नवाज देशमुख, किशोर कोहकडे, जिल्लूभाई पिरजादे, सोपान गाडे, वसंतराव गाडे, संतोष शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. आरक्षण सोडतीनंतर आठवड्याभरात हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रभाकर गाडे विरोधात कोण?

बारागाव नांदूर ग्रामपंचायत सरपंच निवडीसाठी सर्वसाधारण व्यक्तीला आरक्षण सोडत झाल्यानंतर प्रभाकर गाडे यांची सरपंच पदासाठी नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे स्व. शिवाजी गाडे गटाकडून त्यांना सक्षम म्हणून कोणता उमेदवार असणार? याकडे बारागाव नांदूर ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.

गटातटाची बेरीज सुरू

निवडणुकीचा आवाज सुरू होताच बारागाव नांदूर गावामध्ये गटातटाच्या बैठकांनी जोर धरला आहे. कोणाचा पाठींबा कोणाला? याबाबत राजकीय नेत्यांच्या बैठकांनी जोर धरला आहे. बारागाव नांदूर ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार होणार असल्याने राजकीय श्रेष्ठींकडून उमेदवार निवडताना सावध पाऊले टाकण्यास प्रारंभ झाल्याचे दिसत आहे.

प्रभागातील आरक्षण सोडत अशी

सरपंचपदासाठी सर्वसाधारण व्यक्ती उमेदवार असणार हे पूर्वीच जाहिर झालेले आहे. नुकतेच आरक्षण सोडतीमध्ये सहा प्रभागापैकी पहिल्या प्रभागामध्ये इतर मागास प्रवर्ग (स्त्री), सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण व्यक्ती अशा तीन जागा, दोन प्रभागामध्ये अनुसूचिज जमात स्त्री, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण व्यक्ती.

तीन प्रभागामध्ये इतर मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण व्यक्ती असे दोन जागा आहेत. चार प्रभागामध्ये अनुसूचित जाती व्यक्ती, अनूसूचित जमाती महिला व सर्वसाधारण व्यक्ती असे तीन जागा आहेत. पाच प्रभागामध्ये अनुसूचित जमात व्यक्ती, इतर मागास प्रवर्ग व्यक्ती व सर्वासाधारण महिला, प्रभाग क्र 6अनुसूचित महिला, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण व्यक्ती असे आरक्षण निघाले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT