वाळकी(अहमदनगर) : पावसाने फिरवलेली पाठ, दिवसभर उन-वारा, मोकळे आकाश, विहीरी, बोअरवेलने गाठलेला तळ, पाण्याअभावी मरणाला टेकलेली पिके, खरीपासाठी केलेला लाख मोलाचा खर्च वाया जाण्याची भीती, अशा मनस्थितीत नगर तालुक्यातील शेतकरी आहे. पावसाअभावी दुष्काळी संकटाचे सावट घोंगावत असून, शेवटच्या टप्प्यात पावसाळा आला तरी मोठ्या पावसाची प्रतिक्षा करण्याची वेळ शेतकर्यांवर ओढावली आहे. यामुळे बळराजाची झोपच उडवली आहे.
मान्सुनपूर्व आणि मान्सुनच्या पावसाने गुंगारा दिल्याने खरीप हंगामातील पिकांची आशा मावळण्याची चिन्हे आहेत. तालुक्यातील शेतकर्यांमध्ये निराशाचे वातावरण आहे.पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हतबल बनला आहे. तालुक्यातील उत्तर भागात जुनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीयोग्य, तर दक्षिणेत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. त्यात जुलैच्या मध्यात पाऊस पडला. यानंतर मात्र पावसाने गुंगारा दिल्याने पाण्याअभावी खरीप हंगामातील उगवण झालेल्या सोयाबीन, उडीद, मूग, बाजरी, मका, कापूस, तूर, चारापिकांची वाट लागण्याची भीती निर्माण झाली आहे. चारा टंचाईचे संकट दूध उत्पादक शेतकर्यांसमोर उभे ठाकले आहे. दररोज पावसाची वाट पाहून शेतकरी वैतागला.
पावसाच्या आशेवर शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीपातील पिकांची पेर केली. उगवण झालेल्या पिकांना पाण्याची गरज असताना महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने शेत शिवारातील मरणाला टेकली आहेत. आठवडाभरात पावसाने हजेरी लावली नाही, तर खरीपातील पिकांचे वाटोळे होणार हे निश्चित आहे. बी-बियाणे, खते, पेरणीखर्च वाया जाऊन बळीराजा आर्थिक संकटात सापडणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे.
तालुक्यात पावसाच्या आशेवर फळबाग लागवड वाढली आहे. वाळकी परिसर तर फळबागेचे आगारच बनला आहे. सुरुवातीच्या पावसावर संत्रा फळबागांना फळधारणा झाली. सध्या लिंबाच्या आकाराची फळे झाली असून, झाडांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे.
पावसाने खो घातला आहे. या फळबागांची पाण्याअभावी फळगळती होण्याची भीती वाढली आहे. पावसाअभावी फळबागेंचे भवितव्य धोक्यात सापडले आहेत. दिवसभर उन्हाळ्यागत पडणार उन आणि वारा वाहत आहे. पाऊस पडण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही.
ऐन पावसाळ्यात तालुक्यातील 80 टक्के तलाव कोरडे पडले आहेत. या दिवसात दुथडीभरून वाहणारे नदी, नाले असे दिसणारे चित्र गायब झाले. नागरिकांसमोर पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. नगर तालुक्यासह वाळकी, गुंडेगाव परिसरात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके करपण्याची स्थितीत असून, या पिकांचा पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकर्यांची मागणी आहे.
मध्यंतरी कवडीमोल भावाने कांदा विकत असल्याने शेतकर्यांनी चाळीमध्ये कांदा साठवला. कांदा चाळीमध्ये कांदा सडण्याचे प्रमाण वाढल्याने मिळेल त्या भावात शेतकर्यांनी विक्री केली. सध्या कांद्याचे भाव वाढले. पण, शेतकर्यांच्या कांदा चाळीच रिकाम्या झाल्या.
खरीपातील चांगली आलेल्या पिकांची खुरपणीची कामे आली. परंतु, महिनाभरापासून पाऊसच गायब झाल्याने शेतकर्यांनी खुरपणीची कामे थांबवली आहे. खुरपणी थांबल्याने महिला मजुरांच्या हातालाही काम मिळेना. त्यांच्या पुढे रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसाच्या आशेवर खरीपातील पिकांची पेरणी केली. उसणवारी करत खते, बी, बियाणे, पेरणीसाठी मोठा खर्च केला. पिकांची उगवणही चांगली झाली; मात्र पावसाने दगा दिल्याने पिकांची स्थिती अतिषय नाजुक बनली आहे. पाण्याअभावी पिकांनी माना टाकल्या आहेत. केलेला खर्च मातीमोल होणार असल्याने शासनाने पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
बाजीराव नवले, शेतकरी, वडगाव तांदळी
पावसाळ्याचे तीन महिने सरत आले तरी पाऊस नसल्याने वाळकी, गुंडेगाव परिसरात 68 टक्के पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे. आता, दुबार पेरणीसाठी ही पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 25 वर्षांत कधी नव्हे ती परिस्थिती यंदा नगर तालुक्यात झाली आहे. दुष्काळाचे संकट तीव्र झाले आहे.
बबनराव हराळ, गुंडेगाव
हेही वाचा