अहमदनगर

आश्वी : बिबट्याचा वृद्धावर जीवघेणा हल्ला

अमृता चौगुले

आश्वी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द परिसरात दोन महिन्यामध्ये बिबट्या व मनुष्य यातील संघर्ष वाढला असून चार ते पाच वेळा बिबट्याकडून मनुष्यावर हल्ले झाले. शुक्रवार दि. 21 जुलै रोजी सकाळी बिबट्याने रस्त्यावरुन जात असलेल्या एका वृध्द व्यक्तीवर हल्ला केला. यामुळे वनविभागाने खडबडून जागे होत तीन पिंजरे घटनेच्या ठिकाणी लावले.

दाढ खुर्द शिवारातील शिंगोरे वस्ती जवळून पोपट ऊर्फ रामा कारभारी पर्वत हे नेहमीप्रमाणे सकाळी 6. 15 वा. घराकडून व्यवसायानिमित्त गिरणीच्या दिशेने दुचाकीवरून चालले होते. रस्त्याच्याकडेला झुडपात शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करीत त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला.

यावेळी त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे आवाज ऐकून किशोर जोशी व नारायण शिंगोरे यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला हुसकावून लावले. पर्वत यांची बिबट्याच्या जबड्यातून मुक्तता झाली. अन्यथा, मोठा प्रसंग ओढवला असता. यावेळी मुलगा संजय पर्वत व पुतणे विकास पर्वत यांनी दाढ बुद्रुक येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन त्यांना नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

वनविभागाने काही दिवसांपूर्वी याठिकाणी पिंजरा लावला खरा, पण भक्ष्य न ठेवल्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यात अडचणी येतात. दरम्यान, वनपाल सुहास उपासणी, वनरंक्षक हरिश्चंद्र जोजार, बी. सी. चौधरी यांनी घटनास्थळी पाहणी करून आणखी दोन पिंजरे या ठिकाणी लावल्याने परिसरातील लोकांना सुटकेचा निःश्वास सोडला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT