अहमदनगर

नगर : चिचोंडीत सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न फसला

अमृता चौगुले

चिचोंडी शिराळ : पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथील सराफी दुकानासह तीन ठिकाणी दरोडे टाकण्याचा प्रयत्न पाच दरोडेखोरांनी बुधवारी मध्यरात्री केला. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला. पाचही दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. चिचोंडी येथील मुख्य रस्त्यालगत रामस्वरुप लोळगे यांचे अंबिका ज्वेलर्स दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला. मात्र, दरोडेखोरांच्या हातात काहीच लागले नाही. सुरक्षेच्या दृष्टीने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दरोड्याचा सर्व प्रकार कैद झाला. हा सर्व प्रकार मध्यरात्री दोन ते तीन वाजता घडल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यावरून दिसून येत आहे.

गावात तीन दुचाकीवरून येणार्‍या पाच दरोडेखोरांनी दहशत निर्माण केली. त्यांनी एकाच रात्री चिचोंडीतील तीन ठिकाणी दरोडे टाकण्याचा प्रयत्न केला. एकाच रात्रीत दोन दुकाने व एक घर फोडले. यामध्ये चुनीलाल गुगळे यांच्या किराणा दुकानातून किराणा मालाचे नुकसान केले, तर राम स्वरूप लोळगे यांच्या ज्वेलर्स दुकानाचे सेटर तोडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला. अन्य दोन दुकानामध्ये दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चिचोंडी परिसरामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती समजताच पाथर्डीच्या पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी येऊन घटनेची पाहणी करून पंचनामा केला. हा प्रकार पोलिसांना सांगितल्यावर पोलिस पोपट आव्हाड यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या आधारे दरोडेखोरांचा तपास करीत आहेत.

चिचोंडी परिसरात चोर्‍यांचे सत्र सुरूच
चिचोंडी परिसरात चोर्‍यांचे सत्र सुरूच आहे. एक महिन्यापूर्वीच भानुदास आठरे यांच्या वस्तीवरूनलाख रुपये व सोन्या-चांदीचा ऐवज लंपास करण्यात आला. तसेच जबर मारहाण देखील केली होती, असे ग्रामस्थ संतोष गरूड यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT