अहमदनगर

शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयास मान्यता

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहुरी या सहा तालुक्यांसाठी शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्याबाबत बुधवारी अध्यादेश जारी केला आहे. अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाने मोठा आहे.महसूल विभागाशी निगडीत असलेल्या सर्व कामकाजासाठी नागरिकांना अहमदनगर येथील जिल्हा मुख्यालयी जाणे भाग पडत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राहाता तालुक्यातील शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास राज्य शासनाने 13 जून 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली होती.

त्यानंतर राज्य शासनाने 5 जुलै रोजी अध्यादेश जारी करुन शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या नवीन कार्यालयाचे प्रतिवेदन अधिकारी म्हणून अहमदनगर जिल्हाधिकारी आणि नियंत्रक अधिकारी म्हणून नाशिक विभागीय आयुक्त काम पाहाणार आहेत. अपर जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच शिर्डी जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी यांच्या कायर्र्क्षेत्रातील तालुके, त्याअंतर्गत महसूल मंडळे, तलाठी सजा व त्यामध्ये अंतर्गभूत होणार्‍या गावांची यादी प्रसिध्द करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

जुन्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात आठ तालुके
आता शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्य कार्यक्षेत्रात कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहुरी या सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. अहमदनगर येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात नेवासा, शेवगाव, पाथर्डी, अहमदनगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व जामखेड या आठ तालुक्यांचा समावेश असणार आहे.

नवीन कार्यालयासाठी 6 पदे मंजूर
या कार्यालयासाठी 1 अपर जिल्हाधिकारी, 1 नायब तहसीलदार, 1 लघुलेखक (निम्नश्रेणी), 1 अव्वल कारकून व 2 लिपिक टंकलेखक अशी सहा पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजूर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT