अहमदनगर

Nagar News : सभासदांची दिवाळी गोड करणार ; राहुल जगताप यांची ग्वाही

अमृता चौगुले

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : कुकडी साखर कारखान्याने एफआरपीपेक्षा जादा भाव ऊस उत्पादकांना दिला. कारखान्याला 105 कोटी रुपयांचा तोटा दिसत असला तरी को-जनरेशनचे कर्ज कमी केले. मागील वर्षी गाळप केलेल्या उसाचा दुसरा हप्ता देऊन सभासदांची दिवाळी गोड करणार आहे. कामगारांना बोनस देणार आहे. पुढील अहवाल सालात हा तोटा कमी करून कुकडी साखर कारखान्याला वैभवशाली करणार असल्याची ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी दिली. कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याची 26 वी वार्षिक सभा सोमवारी कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

संबंधित बातम्या : 

यावेळी ते बोलत होते. जगताप म्हणाले, कारखाना ऊस उत्पादकांना पैसे देत असतानाच तोडणी मजुरांना 10 कोटींची आगाऊ रक्कम दिली. चालू वर्षी कारखाना वेळेवर सुरू केला जाईल. संस्थापक स्व. कुंडलिकतात्यांचे स्मारक लवकरच उभे करणार आहोत. कारखान्यात खत विभाग सुरू केला जाईल. अ‍ॅडव्हास वसुलीसाठी न्यायालयीन लढाई चालू केली आहे. जगताप म्हणाले, 60 केपीएलडी क्षमतेचा इथेनॉल प्रकल्पास मान्यता मिळाली होती. नव्याने हा प्रकल्प कसा उभा करता येईल, याचा अभ्यास करणार आहोत.

सर्वच साखर कारखान्यांना बाहेरचा ऊस आणावा लागत आहे. कुकडीने गेल्या वर्षी तालुक्यातील 3 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. विरोधकांनी 56 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आणि जालना जिल्ह्यातील ऊसाला जादा भाव दिला, असा गैरसमज निर्माण करुन देऊ नये. असे त्यांनी सांगितले. बीआरएसचे नेते घनश्याम शेलार म्हणाले, तालुक्यातील 15 लाख मेट्रिक टनांपैकी कुकडीला फक्त 56 हजार मेट्रिक टन ऊस मिळाला. भविष्यात खासगी साखर कारखानदारीने डोके वर काढू नये, म्हणून तुम्ही जबाबदारीने कारभार करावा.
जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर म्हणाले, गेल्या वर्षी सभासदांच्या 56 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप कुकडीने केले. मग किमान अशा सभासदांना चांगला भाव द्या.

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे म्हणाले, जगताप परिवाराने कुकडी साखर कारखान्याच्या माध्यमातून वंचित भागाच्या विकासाला दिशा देण्याचे काम केले. यावेळी बंडू जगताप, जयसिंग गावडे, बाजीराव घालमे, सोमनाथ खेडकर, दादा जाधव, गणेश बेरड, शंकर धारकर, तानाजी बोरुडे, अशोक ईश्वरे, प्रा विजय निभोंरे, बाळासाहेब पवार, सुभाष काळोखे, महादेव डोंगरे, गणेश इथापे, गोरख ढोले, बाळासाहेब लगड यांची भाषणे झाली. अहवाल वाचन कारखान्याचे उपाध्यक्ष विवेक पवार व प्रभारी कार्यकारी संचालक अनिल भगत यांनी केले. सूत्रसंचलन मोहनराव आढाव यांनी केले. जालिंदर निंभोरे यांनी आभार मानले.

SCROLL FOR NEXT