अहमदनगर

अहमदनगर : ‘त्या’ अधिकार्‍याच्या बाजूने ठरावासाठी ‘पन्नास खोके’..!

अमृता चौगुले

श्रीगोंदा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : मागील आठवड्यात श्रीगोंदा तालुक्यातील एका मोठ्या संस्थेच्या अधिकार्‍याचे सह्यांचे अधिकार काढण्यात आले. यासाठी घेण्यात आलेल्या ठरावाच्या प्रक्रियेत, 'त्या' अधिकार्‍याच्या बाजूने ठराव करण्यासाठी पन्नास खोक्यांची तडजोड झाल्याची चर्चा तालुक्यात जोर धरू लागली आहे. 'त्या' संस्थेच्या सत्ताधारी गटाच्या मंडळींनी 'त्या' अधिकार्‍याविरोधात नाराजीचा सूर काढत, त्यांच्या कारभारास विरोध सुरू केला. हे होत असताना 'त्या' अधिकार्‍याचे सह्यांचे अधिकार काढण्यासाठी मागील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीपूर्वी सह्यांचे अधिकार काढण्याबाबत सर्वांचे एकमत होते.

पण, बैठकीच्या आदल्या रात्री जादूची कांडी फिरली अन् ठरावाच्या विरोधात मतदान करण्यासाठी एका नेत्याकडून आदेश पारित झाले. अर्थात हा निर्णय कुठून अन् कसा झाला, याची संबंधित लोकांना माहितीच नव्हती. नेत्याचे फर्मान शिरसावंद्य मानत त्या फर्मानाची अंमलबजावणी झाली. संबंधित अधिकार्‍याचे अधिकार काढून आठ दिवस उलटले अन् वेगळीच चर्चा आता जोर धरू लागली आहे. संबंधित अधिकार्‍याच्या बाजूने ठराव करण्यासाठी दोन बड्या मंडळींनी यात आर्थिक तडजोड केल्याची चर्चा आहे. ही आर्थिक तडजोड कुणी केली, ही नावे चर्चिली जात नसली तरी, ही तडजोड कोणी केली याचा अंदाज बांधला जात आहे. तडजोडीच्या वार्ता श्रीगोंदा तालुक्याला नवीन नाहीत. आता आणखी एका तडजोडीच्या घटनेची त्यात भर पडली एवढेच.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT