पाथर्डी; पुढारी वृत्तसेवा : देवराई तालुक्यातील (जि. अहमदनगर) सेवा संस्थेच्या निवडणूक निकालानंतर दोन गटात तलवारीने हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात एकजण ठार तर तीनजण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील देवराई येथे सेवा संस्थेच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी सायंकाळी लागला. यामध्ये सत्ताधारी गटाला अकरा जागा मिळाल्या. तर विरोधी गटाला दोन जागा मिळाल्या. निवडणूक निकालानंतर विजयी गटाने गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये चार जणांवर तलवारीने वार झाला. या हल्ल्यातील तरुणांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले. यापैकी एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ही घटना समजल्यानंतर गावातील वातावरण तणावपूर्ण बनले. ग्रामस्थांनी रस्त्यावर येऊन आंदोलन सुरू केले. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली. सुमारे दोन तास या ठिकाणी ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला होता. यावेळी पाथर्डी शेवगावचे पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते.
अजय गोरख पालवे, विष्णू कैलास पालवे, मनोहर नवनाथ पालवे, वैभव कैलास पालवे, सुमन नवनाथ पालवे अशी तलवारीने हल्ला झालेल्यांची नावे आहेत. यामध्ये अजय गोरख पालवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे देवराई येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. या हल्ल्यातील सर्व आरोपींचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा