अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत देशाचे संरक्षण करत असतात. त्यांच्या कर्तव्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सैनिकांच्या पाठीशी नव्हे तर खांद्याला खांदा देऊन प्रशासन उभे आहे. सैनिकांचे व त्यांच्या कुटूंबियांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिले.
कारगिल विजय दिनानिमित्त महासैनिक हॉल येथे बुधवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी मापारी बोलत होते.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे, सेवानिवृत्त कॅप्टन प्रभाकर चौधरी, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चित्रसेन गडांकुश यांची प्रमुख उपस्थिती होती. येत्या 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह राबविण्याच्या शासनाने सुचना दिलेल्या आहेत. या सप्ताहामध्ये 'सैनिकहो, तुमच्यासाठी' हा उपक्रम 5 ऑगस्ट रोजी जिल्ह्यासह तालुकास्तरावर राबविण्यात येणार आहे. सैनिक व त्यांच्या कुटूंबियांच्या अडचणी तसेच प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या बाबींचा निपटारा करण्यात येणार असल्याचे मापारी यांनी सांगितले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कोरडे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी राजमाता जिजाऊ महिला बचतगटास तीन लक्ष रुपयांचा तर गणेश माजी सैनिक महिला बचतगटास दोन लक्ष रुपयांचा धनादेशही वितरित करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते माजी सैनिक शिवाजी पालवे, मुकूंद पालवे यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी शहिदांना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. या कार्यक्रमास वीरमाता,वीरपिता,माजी सैनिक यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कारगिल ऑपरेशन विजयमध्ये शहीद जवान भानुदास यल्लाप्पा गायकवाड यांच्या वीरपत्नी मिनाबाई गायकवाड व जवान अंकुश दादाभाऊ जवक यांच्या वीरपत्नी कल्पना जवक, ऑपरेशन रक्षकमध्ये शहीद झालेले नायक सुभेदार सुनील रावसाहेब वलटे यांच्या वीरपत्नी मंगल वलटे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. राजमाता जिजाऊ महिला बचतगटास तीन लक्ष रुपयांचा तर गणेश माजी सैनिक महिला बचतगटास दोन लक्ष रुपयांचा धनादेशही वितरित करण्यात आला. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले माजी सैनिक शिवाजी पालवे, मुकूंद पालवे यांचाही सत्कार करण्यात आला.
हेही वाचा