कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कुपलेवाडी, पखालेवाडीतील ९२ कुटुंबांचे स्थलांतर | पुढारी

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कुपलेवाडी, पखालेवाडीतील ९२ कुटुंबांचे स्थलांतर

म्हासुर्ली; पुढारी वृत्तसेवा : जुलै 2021 मध्ये भूस्खलन होऊन जीवितहानी झालेल्या कुपलेवाडी (ता. राधानगरी) व पखालेवाडी येथील 92 कुटुंबांनी स्थलांतर करत येथील शाळांचा आसरा घेतला आहे.

डळमळीत झालेला हा भाग सुदैवाने आहे त्या स्थितीतच राहिला असला तरी भविष्यासाठी धोक्याची घंटाच ठरला आहे. या घटनेला दोन वर्षे झाली असली तरी पावसाचा जोर वाढला की, येथील अनेक कुटुंबांत धाकधूक निर्माण होत आहे. गेले आठवडाभर परिसरात संततधार पाऊस पडत आहे. यापूर्वी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन व महसूल प्रशासनाने या परिसराची पाहणी करून अतिवृष्टीच्या काळात धोक्याची शक्यता लक्षात घेत कुपलेवाडी व पखालेवाडी येथील 92 कुटुंबांना राहती घरे सोडण्याचे लेखी आवाहन सरपंच तसलिम पखाली, ग्रामसेवक टी. के. मडवळ, तलाठी एस. एल. हजारे, पोलिस पाटील शिवाजी पाटील यांनी केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत येथील कुटुंबांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांचा सुरक्षेसाठी आसरा घेतला आहे.

22 जुलै 2021 रोजी मोठी दरड कोसळून एक दोन घरे उद्ध्वस्त होत दोन व्यक्तींसह चार जनावरे मृत झाली होती. या आठवणी अजूनही डोळ्यासमोर तरळत आहेत. येथील 92 कुटुंबांनी शाळेत आसरा घेतला आहे.
– राम कुपले, ग्रामस्थ कुपलेवाडी.

Back to top button