अहमदनगर

‘त्या’ घटनेनंतर कोपर्डीत नांदते आहे तणावपूर्ण शांतता

अमृता चौगुले

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  कोपर्डी घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याच्या आत्महत्येनंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गावात पोलिस छावणी सुरू करण्यात आली आहे. या घटनेनंतर गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. कोपर्डी घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने पुणे येथील येरवडा कारागृहामध्ये आत्महत्या करत, आपले जीवन संपविले. रविवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. कोपर्डी येथे 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन विद्यार्थिनी सायंकाळी आजोबांना बोलविण्यासाठी गेलेली असताना, तिच्यावर आरोपी शिंदे या नराधमाने अत्याचार करून निर्घृण खून करण्याची घटना घडली होती.

या घटनेचे संपूर्ण राज्यामध्ये तीव्र पडसाद उमटले होते. या घटनेनंतरच मराठा क्रांती मोर्चाची खरी निर्मिती झाली होती. राज्यांमध्ये त्यावेळी लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले. त्याच वेळी मराठा आरक्षणाची खरी मागणी समोर आली. या अत्याचार व खूनप्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे यांच्यासह नितीन भैलूमे आणि संतोष भवाळ त्यांच्यावर नगर येथील सत्र न्यायालयामध्ये फास्टट्रॅक न्यायालयामध्ये खटला चालविण्यात आला. अवघ्या 16 महिन्यांमध्ये या खटल्याचा निकाल लागला. सरकारच्या वतीने विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवळ यांनी तीनही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 रोजी फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, संतोष भवाळ याने यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यानंतर त्याच्या विनंतीवरून हा खटला मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आला. तेव्हापासून हा खटला अजूनही प्रलंबित आहे.तीनही आरोपी पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये होते. यातील शिंदेने आत्महत्या केली.

आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी
दरम्यान, आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याच्या निषेधार्थ कोपर्डी येथेही ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे व कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी गावातील मंदिरात आमरण उपोषण सुरू केले होते.

पोलिस निरीक्षक कोपर्डीमध्ये ठाण मांडून
दरम्यान, या घटनेने कोपर्डी गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. रस्त्यावर फारसे कोणी फिरताना दिसत नव्हते. पोलिस निरीक्षक घनश्याम बळप हे स्वतः कोपर्डीत दिवसभर ठाण मांडून बसले होते.
त्यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

मृतदेह कोपर्डीत आणण्यास विरोध
आरोपी जितेंद्र शिंदे हा कोपर्डी येथील असला तरी त्याचा मृतदेह गावात आणण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी शिंदे यांच्या नातेवाईकांशी संपर्क करून मृतदेह कर्जत तालुक्यामध्ये कुठेही आणू नये, अशा सूचना दिल्या आहेत.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT