अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नगरकरांसाठी महत्त्वपूर्ण असलेली अमृत योजना पूर्ण झाली असून, आता वितरण व्यवस्थेवर भर देण्यात येत आहे. आता कमी खर्चात आणि प्रायोगिक तत्त्वावर चोवीस तास पाणी देण्यासाठी महापालिकेकडून सातशे कोटी रुपयांच्या योजनेचा नवीन प्रस्ताव केंद्र सरकारची अमृत योजना व राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेंतर्गत सादर केला आहे. नगर शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेली 'अमृत 2' पाणी योजना शंभर टक्के पूर्ण झाली असून, शहरात अंतर्गत वितरण व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील आहे.
आता ही योजना पूर्ण झाल्याने आणखी शहरासाठी नवीन पाणी योजना आणण्यासाठी महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. योजनेला आता सर्वांत जास्त विजेचा खर्च आहे. यामध्ये सौरऊर्जा प्रकल्प, नळकनेक्शनला मीटर रिडिंग, 1972 ची पाईपलाईन बदलणे, विस्तारित शहरासाठी जलवाहिनी व पाण्याची टाकी, कल्याण रोडसाठी स्वतंत्र जलवाहिनी, अशी कामे प्रस्तावित आहेत.
महापालिकेने प्राथमिक स्वरूपाचा सातशे कोटींचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे दाखल केला आहे. तो राज्य शासनाकडून प्रादेशिक जीवन प्राधिकरण विभागाकडे पडताळणीसाठी देण्यात येईल. त्यानंतर योजनेचा अंतिम आरखडा तयार होईल. महापालिकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून, राज्याकडून प्रस्ताव केंद्राकडे जाणार आहे. त्यानंतर त्याला अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वांत जास्त खर्च विजेचा आहे. त्यामुळे पिंपळगाव माळवी तलावाशेजारील मोकळ्या जागेत 35 मॅगावॉट वीज क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल. तिथे निर्माण होणारी वीज ही पाणीपुरवठा योजनेसाठी पुरविण्यात येईल, असे प्रस्तावात नमूद आहे.
अमृत दोन योजनेंतर्गत शहरातील सर्वच नळांना शंभर टक्के मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यात एक लाख 10 हजार नळकनेक्शनचा समावेश असणार आहे. शंभर टक्के मीटर रिडिंगमुळे पाण्याची चोरी थांबणार असून, पाण्याची 25 टक्के बचत होणार आहे.
शहरात सर्वत्र जलवाहिनी आणि मुख्य जलवाहिनी भक्कम बनविण्यात आल्यानंतर सर्व नळकनेक्शनला मीटर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिक पाण्याचा वापर काटकसरीने करतील. त्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर शहरातील एखाद्या झोनमध्ये 24 तास पाणी देण्यात येईल.
मुळानगर ते विळद अशी 1972 मध्ये केलेली 600 एमएम व्यासाची पाईपलाईन फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे 'अमृत 2' योजनेंतर्गत ही पाईपलाईन बदलण्यात येणार आहे. तसेच, पंपाचे एनर्जी ऑडिट करून गरजेनुसार पंप बदलण्याचाही प्रस्ताव आहे.
नगर शहर गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. त्यात तुलनेत अनेक ठिकाणी पाण्याच्या लाईन नाहीत. पाण्याच्या टाक्याही नाहीत. त्यामुळे नव्याने वसाहती होत असलेल्या तपोवन रोड पुलाच्या दोन्ही बाजू, बोल्हेगाव, कल्याण रोड, केडगाव लोंढे मळा, राहिंज मळा, हनुमान नगर आदी भागात नव्याने पाईपलाईन व पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार येतील.
कल्याण रोड परिसराची गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी वणवण आहे. आजही काही भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे विळद पंपिंगस्टेशन ते कल्याण रोड अशी पाईपलाईन करण्यात येणार आहे. ही पाईपलाईन बाह्यवळण रस्त्याने नेण्यात येणार आहे.
'अमृत-2' व नगरोत्थान योजनेंतर्गत 700 कोटी रुपयांच्या पाणी योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. त्यात मीटरसह महत्त्वाच्या सौरऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे.
– परिमल निकम, जलअभियंता
हेही वाचा