नगर : पुढारी वृत्तसेवा : नोकरी, शिक्षण आणि पर्यटनासाठी परदेशवारी करण्यासाठी आवश्यक असणारा पारपत्र परवाना अर्थात पासपोर्ट काढण्यासाठी नगर येथील पोस्ट ऑफिस कार्यालयातील पारपत्र कार्यालयात विद्यार्थ्यांसह नागरिकांची गर्दी होत आहे. दररोज सरासरी 40 ते 45 जण नोंदणी करीत आहेत. पारपत्र तथा पासपोर्ट काढण्यासाठी जिल्ह्यातील युवकांना पुणे येथील पासपोर्ट कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागत. विद्यार्थी व नागरिकांचे हेलपाटे थांबावे यासाठी तत्कालीन खासदार स्व. दिलीप गांधी यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात विशेष पाठपुरावा केला. त्यामुळे पोस्ट खात्याच्या सहकार्याने अहमदनगर येथे 2018 पासून पासपोर्ट कार्यालय कार्यान्वित झाले आहे. या कार्यालयामुळे नागरिकांच्या वेळेची आणि पैशांची बचत झाली.
संबंधित बातम्या :
पासपोर्ट काढण्यासाठी आता ऑनलाईन नोंदणी करावी लागत आहे. त्यासाठी दीड हजार रुपये शुल्क अदा करावे लागत आहे. नोंदणी झाल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी अहमदनगर येथील कार्यालयात पाचारण केले जाते. तपासणीनंतर कागदपत्रके पुणे येथील पासपोर्ट कार्यालयाकडे ऑनलाईन पाठविले जातात. तेथेही या तपासणी झाल्यानंतर पोलिसांकडून संबंधित व्यक्तीची पडताळणी होते. ही सर्व प्रक्रिया वीस ते बावीस दिवसांत पूर्ण होते. त्यानंतर पोस्टाद्वारे पासपोर्ट संबंधित व्यक्तींच्या घरी येत आहे. पासपोर्टसाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या 40 ते 45 व्यक्तींना एका दिवशी मुलाखतीसाठी बोलावले जाते. वर्षभरात जवळपास 10 हजार जणांची मुलाखात घेतली जाते. नगर पासपोर्ट कार्यालयात गेल्या पाच वर्षांत जवळपास 50 हजार नागरिकांनी पासपोर्टसाठी मुलाखती दिल्या आहेत.