अहमदनगर

नगर शहरात रस्ते खोदाईचे 136 कोटी मृगजळ

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : नगर शहरात रस्ते खोेदाईसाठी असलेले दर स्थायी समितीने दीडपट वाढविल्याने कंपन्यांनी त्याला नकारघंटा दर्शविली आहे. दरम्यान महापालिका व संबंधित कंपन्यांत बिनसल्याने 136 कोटी रुपये मृगजळ ठरण्याची चिन्हे आहेत. शहरात किती कंपन्यांनी किंवा खासगी व्यक्तीने किती किलोमीटर रस्ते खोदले याचा सविस्तर अहवाल देण्यासोबतच रस्ते खोदाईपोटी प्रतिमीटर किती दर आकारणी करावी याचे गणित मांडणार आहे. त्याकरीता महापालिकेने या एजन्सीला 25 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवित मेहरबानी दाखविली आहे.

महापालिकेच्या प्रभाग एक व दोनमध्ये गॅस पाईपलाईनसाठी खोदाई सुरू आहे. त्यासाठी महापालिकेने प्रतिरनिंग मीटर 2 हजार रुपये, तर ड्रिलिंगसाठी प्रतिमीटरला 3 हजार रुपये दर आकारला. यातून महापालिकेचे भले होत नाही, असा तर्क लढवित स्थायी समितीने दरवाढीचा ठराव केला. महापालिकेने 8 हजार आणि ड्रिलींगसाठी 10 हजार असा केलेला दर वाढवित स्थायी समितीने तो 13 आणि 15 हजार इतका केला. मात्र या दरवाढीला संबंधित कंपन्यांनी विरोध दर्शविला आहे.

यासंदर्भात आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठका होऊन चर्चा झाली. परंतू, त्यावर तोडगा निघाला नाही. अखेर महापालिकेने शहरातील खोदाई केेलेल्या रस्त्यांचे सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला. ठाणे येथील सुमन इंन्फ्रा सर्व्हीसला सर्वेक्षणाचे काम देण्याच्या हालचाली असून, सर्वेक्षणानंतर दरावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. तोडगा निघत नाही तोपर्यंत रस्ता खोदाईतून मिळणारे 136 कोटी सध्या मृगजळ ठरल्याची चर्चा आहे.

रस्ते खोदाईतून मिळणारा निधी त्याच प्रभागात खर्च करावा. रस्ते खोदाई होते पण पुन्हा नव्याने काम होत नाही, यासाठी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यामुळे स्थायी समितीचे तत्कालीन सभापती कुमारसिंह वाकळे यांनी रस्ते खोदाईसाठीचे दर वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. घरगुती कामासाठी दर जैसे ते ठेवण्यात आले. तर, शहरात गॅस पाईपलाईन, केबल लाईन अशा कामांसाठी रस्ते खोदाईचा दर प्रति स्क्वेअर मीटर पंधरा हजार रुपये करण्यात आला. दरम्यान, प्रशासनाने तो दर दहा हजार रुपये ठरविला होता. स्थायी समितीने तो थेट 15 हजारांवर नेला. तो प्रस्ताव मंजूर केला.

यापूर्वी नगर शहरात गॅस पाईपलाईनसाठी भारत गॅस रिर्सोसेस कंपनीने 1,2,3,4 व 5 वार्डामध्ये खोदाई केली होती. त्यांना महापालिकेने प्रतिरनिंग मीटर 2 हजार रुपये, तर ड्रिलिंगसाठी प्रतिमीटरला 3 हजार रुपये दर आकारला होता. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. मात्र महापालिका प्रशासनाने प्रतिरनिंग मीटरसाठी 10 हजार, तर ड्रिलिंगसाठी 8 हजार रुपये मीटरप्रमाणे दर देण्याचा प्रस्ताव कंपनीला दिला आहे. कंपनीने दुसर्‍या टप्प्यात 52 किलोमीटरवर खोदाई व 120 किलोमीटर ड्रिलिंगसाठी परवानगी मागितली आहे.

खोदाईने अनेक रस्त्यांची चाळण

गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदायचे काम प्रभाग एक, दोन, तीन, चार व पाचमध्ये करण्यात आले. त्या बदल्यात कंपनीकडून महापालिकेला सात कोटी 85 लाख रुपये मिळाले. या रस्ते खोदाईच्या कामामुळे पाचही प्रभागातील रस्त्यांची चाळण झाली होती. तर दुसरीकडे पाण्याच्या जलवाहिन्या फुटल्या होत्या. आता तीच परिस्थिती पुन्हा होऊन नये म्हणून महापालिका प्रशासन सजग पाऊले उचलत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT