पीक विम्यासाठी लूट केल्यास कारवाई File Photo
महाराष्ट्र

PM Crop Bima Yojana| पीक विम्यासाठी लूट केल्यास कारवाई

पुढारी वृत्तसेवा

राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत प्रतिविमा अर्ज एक रुपयाप्रमाणे योजनेतील सहभाग शासनाने देऊ केला आहे. राज्यात शेतकऱ्यांकडून सामान्य सेवा केंद्र (कॉमन सर्व्हिस सेंटर-सीएससी) चालकांमार्फत प्रतिअर्ज एक रुपयापेक्षा अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

तरी शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागात तक्रार केल्यास त्वरित दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा कृषी आयुक्तालयाने दिला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने गतवर्षापासून घेतला आहे.

गतवर्षी खरीप २०२३ मध्ये राज्यातील विक्रमी असे १ कोटी ७० लाख विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. खरीप २०२४ मध्ये ३० जूनपर्यंत ४० लाख विमा अर्ज नोंद झाली आहे. यंदा योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत १५ आहे. पीक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन १४४४७ संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विनयकुमार आवटे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना विमा योजनेमध्ये सहभागासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.

शेतकरी स्वतः केंद्र सरकारचे विमा पोर्टल www. pmfby. gov. in वर ऑनलाइन अर्ज भरू शकतो. शेतकऱ्याचे ज्या बँकेमध्ये खाते आहे, त्या बँकेमध्ये जाऊन तो विमा अर्ज भरू शकतो. कर्जदार शेतकऱ्यांनी विमा मुदत संपण्याच्या किमान सात दिवस आधी विमा योजनेत सहभाग घ्यायचा असल्याबाबत संबंधित वित्तीय संस्थेस कळविल्यास त्या संस्थेमार्फत त्याचा विमा हप्ता जमा करून त्यांना सहभागी करून घेण्यात येते.

राज्यात काही ठिकाणी काही सीएससी केंद्रचालक शेतकऱ्याकडून प्रतिअर्ज रुपये एकपेक्षा अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत अशा प्रकारची घटना घडत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा सीएससीप्रमुख यांच्याकडे तक्रारी केल्यास त्याची दखल घेऊन कडक कारवाई करण्याचा इशाराही आवटे यांनी दिला आहे.

सीएससी केंद्रांना प्रतिशेतकरी ४० रुपये शुल्क निर्धारित

प्रधानमंत्री हप्ता पीकविमा योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांना एक रुपया विमा भरावयाचा आहे, तर केंद्र सरकारने नियुक्त केलेले विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत सहभाग घेऊ शकतो. सीएससी केंद्रचालकांना प्रतिशेतकरी ४० रुपये शुल्क केंद्र सरकारने निर्धारित करून दिलेले आहे. हे शुल्क संबंधित विमा कंपनी ही सीएससी केंद्रांना देणार आहे. याव्यतिरिक्त अन्य शल्क सीएससीचालक घेऊ शकत नाहीत. मात्र, शेतकऱ्याने सातबारा उतारा व ८ अ स्वतः काढून दिला पाहिजे किंवा शासकीय शुल्क भरून ऑनलाइनवर प्राप्त करून घ्यावा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT