Ambadas Danve
शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंचं ५ दिवसांसाठी निलंबन file photo

शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंचं ५ दिवसांसाठी निलंबन

राहुल गांधींच्या वक्तव्यावरून विधानपरिषदेत अप-शाब्दिक चकमक
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानपरिषदेत आपल्या दिशेने हातवारे केले म्हणून संतप्त झालेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी भाजपा सदस्य प्रसाद लाड यांना शिवी हासडली होती. त्यांच्या वक्तव्यावरून आजही सभागृहात गदारोळ झाला. दानवे यांचे निलंबन करावे, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. यानंतर उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन केले आहे.

राहुल गांधींच्या वक्तव्याचे लोण थेट विधिमंडळात

विधिमंडळाच्या अधिवेशनासोबतच दिल्लीत लोकसभेचेही अधिवेशन सुरू आहे. सोमवारी या अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी एका धर्मियांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी हंगामा केला. त्याचे लोण थेट राज्य विधिमंडळाच्या विधान परिषदेत पोहोचले. भाजपा सदस्य प्रसाद लाड यांनी आक्रमक भूमिका घेत संसदेतील कथित वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या निषेधाचा सभागृहात ठराव करून तो लोकसभेकडे पाठवावा, अशी मागणी केली. भाजपाच्या अन्य सदस्यांनीही लाड यांच्या मागणीला प्रतिसाद देत सभागृहात हंगामा केला. सत्ताधाऱ्यांचा हंगामा सुरू असतानाच विधान परिषद विरोधी पक्षनेते दानवे भाषण करायला उभे राहिले. ते म्हणाले, हा प्रकार लोकसभेत झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा विधान परिषदेच्या कामकाजाशी काहीही संबंध नसल्याचे ते बोलत होते.

दानवे-लाड यांच्यात अप-शाब्दिक चकमक

दानवे यांचे भाषण सुरू असतानाच लाड हे त्यांच्या दिशेने हातवारे करत बोलत होते. त्यामुळे आपल्या दिशेने हातवारे न करता आपण उपसभापतींच्या दिशेने बोलावे, अशी सूचना दानवे यांनी केली. तरीही लाड हातवारे थांबू शकले नाहीत. यामुळे संतापलेल्या दानवे यांनी लाड यांना शिवी हासडली. लाड यांच्याकडून पलटवार झाल्यामुळे दानवे यांनी दुसऱ्यांदा लाड यांना अपशब्द वापरले. यावेळी भाजपा गटनेते उभे राहिले आणि दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सभागृहात असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नाही. त्यामुळे दानवे यांनी माफी मागावी, असा दरेकर यांनी आग्रह केला. या घटनेनंतर विधान परिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त करत सभागृह दिवसभर तहकूब केले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news