Latest

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी 11 सप्टेंबरपर्यंत भरता येणार 17 नंबरचा अर्ज

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2024 मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होण्यासाठी 17 नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार बारावीसाठी 10 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर आणि दहावीसाठी 14 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी मंगळवारी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

आर्थिक दुर्बल घटकांमधील अनेक विद्यार्थी 17 नंबरचा अर्ज भरून दहावी-बारावीची परीक्षा देतात. त्याचप्रमाणे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे अनेक विद्यार्थी काम करतात. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ शिक्षण घेता येत नाही. या सर्व विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीची परीक्षा देता यावी, यासाठी राज्य मंडळाकडून परीक्षेला खासगीरीत्या बसण्याची संधी दिली जाते. त्यासाठी या विद्यार्थ्यांना 17 नंबरचा अर्ज आणि शुल्क भरावे लागते. राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार बारावीसाठी 10 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर आणि दहावीसाठी 14 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्क भरल्याची पावती दोन प्रतीत, मूळ कागदपत्रे जमा करण्यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना 12 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना 17 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालयांना विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्काची पावती, मूळ कागदपत्रे आणि विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे 15 सप्टेंबरपर्यंत जमा करणे गरजेचे असल्याचे मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

संपर्क केंद्रामार्फत होणारी नावनोंदणी आता बंद…

दहावीसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी सध्या संपर्क केंद्रामार्फत नावनोंदणी प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र प्रचलित पध्दतीमधील अडचणींचा, त्रुटींचा विचार करुन योजना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभदायी, सुलभ व विद्यार्थी केंद्रीत व्हावी या दृष्टीने सध्याची संपर्क केंद्र शाळेमार्फत नाव नोंदणी अर्ज स्विकारण्याची प्रचलित पध्दत बंद करुन बारावीच्या विद्यार्थ्यांचे ज्या पध्दतीने सर्व कनिष्ठ महाविद्यालयातून नाव नोंदणी अर्ज स्विकारण्यात येतात. त्याप्रमाणेच दहावीच्या खाजगी विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज माध्यमिक शाळांमधून स्विकारण्याची कार्यपध्दती मार्च 2024 च्या परीक्षेपासून सुरु करण्यात येणार आहे.

या कागदपत्रांची गरज

विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, दाखला नसल्यास द्वितीय प्रत आणि प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो जवळ ठेवावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना ही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. संपर्कासाठी विद्यार्थ्यांनी ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक नोंदवणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत ई-मेल आयडीवर पाठवली जाणार आहे. या अर्जाची प्रिंट आउट, शुल्क भरल्याची पावती, हमीपत्र आदींची छायाप्रत प्रत्येकी दोन प्रतीत काढून ठेवावी, असे आवाहन राज्य मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनो हे लक्षात ठेवा…

दहावीसाठी अर्जाची लिंक – htpp://form17.mh-ssc.ac.in
बारावीसाठी अर्जाची लिंक – htpp://form17.mh-hsc.ac.in
दहावीसाठी शुल्क – 1000 रुपये शुल्क आणि 100 रुपये प्रक्रिया शुल्क
बारावीसाठी शुल्क – 600 रुपये शुल्क आणि 100 रुपये प्रक्रिया शुल्क

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT