मुंबई : मंत्रालयात आलेल्या धमकीच्या कॉलप्रकरणी वयोवृद्धाला अटक

मुंबई : मंत्रालयात आलेल्या धमकीच्या कॉलप्रकरणी वयोवृद्धाला अटक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मंत्रालयात आलेल्या धमकीच्या कॉलप्रकरणी प्रकाश किशन खेमानी (वय ६१) वर्षांच्या वृद्धाला एका तासांत कांदिवली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. प्रकाश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध कांदिवली पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला मंगळवारी (दि.८) दुपारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले.

सोमवारी (दि.७) रात्री दहा वाजता मंत्रालयातील कंट्रोल रुममध्ये एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. कॉलवरुन या व्यक्तीने आगामी १५ ऑगस्टला मंत्रालयात मोठा इव्हेंट होणार असून त्यात अनेक मान्यवरासह दहशतवादी उपस्थित राहणार आहे. या दहशतवादी कनेक्शन आहे असे सांगून फोन कट केला. या घटनेनंतर मंत्रालयातील टेबल लेखनिक यांनी ही माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला दिली होती. प्राथमिक तपासात हा कॉल कांदिवली परिसरातून आला होता. त्यामुळे ही माहिती कांदिवली पोलिसांना देण्यात आली.

या माहितीची एसीपी शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्‍वासराव यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर अवघ्या एका तासांत पोलिसांनी कांदिवलीतील मथुरादास रोड, ओम शांती सरजीज सोसायटीमध्ये राहणार्‍या प्रकाश खेमानी ६१ वर्षांच्या वृद्धाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यानेच मंत्रालयात धमकीचा बोगस संदेश पाठवून तणावाचे वातावरण निर्माण केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि सिमकार्ड जप्त केला आहे.

प्रकाश खेमानी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध कांदिवली पोलीस ठाण्यात २०१२ रोजी पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्याच्याविरुद्ध जानेवारी २०२३ रोजी मारामारीसह शिवीगाळ करुन धमकी दिल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला होता. या दोन्ही गुन्ह्यांत त्याला स्थानिक न्यायालयाने जामीन दिला होता. आता त्याच्याविरुद्ध तिसर्‍या गुन्ह्यांची नोंद झाली असून या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक बुधवंत करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news