Latest

शेतकर्‍यांनी पेरण्यांसाठी घाई करु नये; कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांचे आवाहन

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 व 25 जूननंतर अरबी समुद्रावरुन येणार्‍या नैऋत्य मोसमी वार्‍यांना गती मिळण्याची शक्यता असून सर्वत्र चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे साधारणत: 80 ते 100 मिलिमिटर पाऊस पडल्यानंतरच खरीप हंगामातील पिकांची पेरणी करावी. तोपर्यंत शेतकर्‍यांनी पेरण्यांची घाई करु नये, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

चालू वर्षी मान्सूनचे आगमन काहीसे लांबल्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी करताना विशेष दक्षता घ्यावी. तसेच पेरणी संदर्भात नियोजन करावे, असे नमूद करुन त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, आपत्कालीन पीक परिस्थितीत शेतकर्‍यांनी कशा प्रकारची काळजी घ्यावी, यासंदर्भात कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव, सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, त्याचप्रमाणे भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर आदी उपस्थित होते. हवामान बदलानुसार सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे. त्यामुळे नवीन सामान्य पाऊस कालावधी (न्यू नॉर्मल मान्सून पिरीयड) हा 24 ते 25 जून असेल असा अंदाज वेधशाळेने सांगितला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पीक नियोजनासंदर्भात योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे.

हवामान खात्यामार्फत पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज दिला जातो. या पावसाच्या अंदाजाची माहिती प्रसिद्धी माध्यमांद्वारे शेतकर्‍यांना देण्यात येईल. कृषी विद्यापीठ, कृषी विद्यापीठांचे संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्र यांच्या सहाय्याने स्थानिक आपत्कालीन पीक नियोजन करण्यात येणार आहे. क्षेत्रीय यंत्रणांना या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्याबाबत सूचना कृषी विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

पाण्याचा ताण सहन करणारे वाण निवडा

नवीन सामान्य पाऊस कालावधीचा विचार करता शेतकर्‍यांनी पेरणी करताना लवकर येणार्‍या व पाण्याचा ताण सहन करणार्‍या पिकांच्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी. पाऊस उशीरा आल्यामुळे शेतकर्‍यांनी धूळ पेरणी करु नये. पेरणीसाठी साधारणपणे 20 टक्के जादा बियाणांचा वापर करावा. सलग संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी. त्याप्रमाणे जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादनासारख्या तंत्राचा वापर करावा.

आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन

शेतकर्‍यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून 1800-2334000 या टोल फ्री क्रमांकावर शेतकर्‍यांनी संपर्क साधावा.

हेही वाचा: 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT