Latest

 Mahabaleshwar : महाबळेश्वरला ‘हुडहुडी’; वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात हिमकणांचा नजराणा…

सोनाली जाधव

महाबळेश्वर; प्रेषित गांधी : महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या पर्यटनस्थळ महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक, लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य आज ( दि. ११) पहाटे पाहावयास मिळाले. पहाटे वेण्णालेक सह लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा ०३ ते ०४ अंश पर्यंत खाली गेला असल्याची माहिती मिळत आहे.( Mahabaleshwar)

वेण्णालेक परिसरामध्ये आज पहाटे वाहनांवर, पानांवर, वेण्णालेक नौकाविहारासाठी ये -जा करण्यासाठी असलेल्या लोखंडी बोटीवर काही प्रमाणात हिमकण जमा झाल्याचे चित्र दिसले. तर लिंगमळा परिसरातील स्मृतिवन भागात देखील पाने, झाडेझुडपांवर हिमकण पाहावयास मिळाले. या हंगामातील ही पहिलीच घटना असून, थंडीचा कडाका असाच कायम राहिला तर वेण्णालेक परिसरामध्ये पुन्हा हिमकणाचा अनुभव पर्यटकांना मिळेल.

 Mahabaleshwar : यंदा हिमकण दिसण्याची पहिलीच वेळ

महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे.गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढत चालले असून वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. महाबळेश्वर सोडून २० किमी खाली गेल्यावर असणारी बोचरी थंडी व महाबळेश्वरमध्ये असणारी गुलाबी थंडी यातील फरकाची मात्र पर्यटक अनुभवत आहेत. सध्या वेण्णालेक परिसरामध्ये होणारे हिमकण पाहण्यासाठी व गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटनाची पाऊले या थंड हवेच्या निसर्गरम्य ठिकाणी वळत आहेत. वेण्णालेक परिसरामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिकांनी शेकोटीचा आधार घेतल्याचे पाहावयास मिळत आहे. येथील प्रसिद्ध वेण्णालेक परिसरामध्ये वाहनांच्‍या टपांवर, पानांवर, नौकाविहारासाठी तयार केलेल्या वेण्णालेकच्या जेटीवर काही प्रमाणात दवबिंदू गोठून हिमकण जमा झाल्याचे पहावयास मिळाले.  यंदा थंडीच्या हंगामातील हिमकण दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.

'काश्मीर' च्या थंडीचे 'फील'

महाबळेश्वर पर्यटनास आलेले पर्यटक या कडाक्याच्या थंडीमुळे "काश्मीर" च्या थंडीचा "फील" अनुभवत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे दिवसभर पर्यटक स्वेटर, शोल्स, मफलर, कानटोपी अश्या गरम वस्त्रे परिधान गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत असून, मुख्य बाजारपेठेत देखील उबदार शाल, स्वेटर मफलर, ब्लँकेट्स आदींच्या खरेदी करताना पर्यटक दिसत आहेत. हॉटेल्समध्‍ये पर्यटकांसाठी "बॉनफायर" ची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे तर शहरालगतच्या अनेक ढाब्यांवर शेकोटीचा आधार अनेकजण घेत आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT