Nashik : आहारात तृणधान्यांसाठी प्रशासनाची मोहीम; 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित | पुढारी

Nashik : आहारात तृणधान्यांसाठी प्रशासनाची मोहीम; 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्यांची आहारातील व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने सर्व स्तरावरून प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मंगळवारी (दि.१०) जिल्हा कार्यकारी समितीच्या आयोजित बैठकीप्रसंगी गंगाथरन डी. बोलत होते. बैठकीस जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा पर्यटन अधिकारी मधुमती सरदेसाई, समाजकल्याण सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी जयंत गायकवाड यांच्यासह डॉ. हिमानी पुरी, नीलिमा जोरवर हे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले की, तृणधान्य पिकांच्या उत्पादन क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन नियोजन करण्यात यावे. अंगणवाडी, प्राथमिक शाळा व समाजकल्याण विभागांतर्गतच्या आश्रमशाळा, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात तृणधान्यांचा अधिकाधिक समावेश करावा. विविध कार्यक्रमांद्वारे याबाबत जनजागृती करताना त्यात इतर विभागांनाही सहभागी करून घेण्यात यावे. यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजनअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मिलेट फूड फेस्टिव्हल

जिल्हा परिषदेमार्फत बचतगटांच्या माध्यमातून 17 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत मिलेट फूड फेस्टिव्हल आयोजनाचे नियोजन सुरू आहे. त्या फेस्टिव्हलमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा अशा विविध तृणधान्यांपासून तयार केलेले 100 पेक्षा अधिक पदार्थ ठेवण्यात येतील, अशी माहिती आशिमा मित्तल यांनी दिली. बैठकीत आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने तयार केलेल्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय शाळांच्या आवारातील भिंती व दर्शक स्थळे निश्चित करून त्याठिकाणी पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त घोषवाक्यांसह भित्तिचित्रे काढण्यात यावीत. आदिवासी भागात आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक आहाराचे महत्त्व लक्षात घेता नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने त्या भागात जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

हेही वाचा :

Back to top button