नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यात राज्यातील सत्तेतही बदल झालेला आहे. त्यामुळे पदवीधरच्या आचारसंहिता पूर्वसंध्येला उत्तर आणि दक्षिण विभागात घेतलेल्या रस्त्यांच्या 219 कामांमध्ये आपण सूचवलेली कामे घेतलीच नसल्याची नाराजी महाविकास आघाडीतील माजी सदस्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेतून 3054 लेखाशिर्षाखाली रस्त्यांची कामे घेतली जातात. झेडपीत पदाधिकारी असताना तत्कालिन सत्त्तेतील पदाधिकार्यांनी व सदस्यांनी कामे सुचविली होती. मात्र या कामांच्या प्रशासकीय मान्यता बाकी असतानाच प्रशासकाची नियुक्ती झाली.
पुढे राज्यातील सरकारही बदलले. त्यानंतर जिल्हा नियोजनच्या निधीलाही ब्रेक लागला होता. यामुळे ही कामे कागदावरच रेंगाळलेली दिसली. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियोजनचा खर्च करण्यासाठी हिरवा कंदिल दर्शवला. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने प्रशासकीय मान्यतांसाठी हालचालींना वेग दिला. त्यात पदवीधरच्या आचारसंहितेचा अडथळा पाहता प्रशासनाने मोठ्या तत्परतेने कामे निवडून त्याच्या प्रशासकीय मान्यता घेतल्या. मात्र हे कामे घेत असताना काही माजी पदाधिकारी तसेच सदस्यांनी सुचविलेल्या कामांचा यामध्ये समावेश नसल्याने त्यांनी जिल्हा परिषदेत येवून काहीशी नाराजी व्यक्त केली. मात्र आपण महाविकास आघाडीत असताना कोणाला, कसा न्याय दिला, हे त्यांनाही माहिती असल्याने त्यांनीच अधिकार्यांसमोर हे होणारच होते, अशी मिश्किल टिप्पणी करत माध्यमांनाही उत्तर देण्याचे टाळले.
उत्तर विभागाअंतर्गत जिल्हा नियोजनच्या निधीतून 124 कामे घेण्यात आलेली आहेत. त्यावेळच्या पदाधिकारी व सदस्य मंडळाने ही कामे सुचवलेली असावीत. त्याच कामांना प्रशासकीय मान्यता घेण्यात आलेल्या आहेत.
संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता, उत्तर
आम्ही आमच्या गटातील, तालुक्यातील रस्त्यांची कामे सुचवलेली होती. मात्र कालच्या प्रशासकीय मान्यतांमध्ये ती कामे दिसत नाहीत. कामे आणि निधीचा नैसर्गिक समतोलही पहायला मिळत नाही. सर्वच तालुक्यांना समान न्याय द्यायला हवा. प्रशासनाचे स्वतः लक्ष वेधणार आहोत, अशी खंत महाविकास आघाडीच्या एका माजी पदाधिकार्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्तकेली.
या कामांमधून अनेक गावांची मुलभूत रस्त्यांची प्रश्ने मार्गी लागणार आहेत. आता नवीन कामे ही कोणत्या तालुक्यातील, कोणत्या राजकीय नेत्याच्या गटांत घेतलेली आहेत, हे पाहण्यापेक्षा ती जिल्ह्यातच होणार आहेत, हा उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून यावर महाविकास आघाडीने राजकारण करू नये, असा सूर भाजपकडून आळविला जात आहे.
झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशातच ज्या गटात ही कामे होणार आहेत, त्यांना आगामी निवडणुकीत राजकीय फायदा होणार आहे. त्यामुळे या कामांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे.