Latest

Maharashtra Bandh Live : राज्यातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

दीपक दि. भांदिगरे

लाईव्ह अपडेट्स…

साताऱ्यात लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा मोर्चा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

लखीमपूर येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज (रविवार) सातारा शहरात महाविकास आघाडीच्या वतीने राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. यावेळी भाजप सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील झाले होते. सातारा शहरात या बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळत असल्यामुळे मोर्चातील अनेक जणांनी दुकानदारांना दुकाने बंद करायला लावली.

अन्नदात्यासाठी जनतेने 'महाराष्ट्र बंद'ला स्वतःहून पाठिंबा द्यावा : नवाब मलिक

उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. याविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी ११ ऑक्टोबर रोजी 'महाराष्ट्र बंद' पुकारला आहे. या बंदला सर्वच नागरिकांनी स्वतःहून पाठिंबा द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले.

मुंबई येथे महाविकास आघाडीतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. शिवसेनेचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

सोमवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजीचा बंद कडकडीत पाळण्यात येणार असल्याचे सुतोवाच नवाब मलिक यांनी यावेळी केले. आपल्या अन्नदात्यासाठी हा बंद आहे. व्यापाऱ्यांनी आणि सामान्यांनी स्वतःहून बंदला पाठिंबा द्यावा. तसेच बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. रविवारी रात्री १२ वाजल्यापासून हा बंद सुरु होईल, अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली.

भाजप हा पक्ष शेतकऱ्यांचा नाही तर शेतमालावर डल्ला मारणाऱ्यांचा पक्ष होता. आता तर भाजप शेतकऱ्यांना चिरडून मारणारा देखील पक्ष बनला आहे. या जुलमी सरकारला आव्हान देण्यासाठी महाराष्ट्रातील समस्त १२ कोटी जनतेने 'महाराष्ट्र बंद'मध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी तात्काळ राजीनामा दयावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली.

कोल्हापूर : मुरगूड, मुदाळतिट्टा परिसरात बंद, रास्ता रोको

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : लखीमपूर येथे झालेली शेतकरी हत्याकांड व भाजप सरकारच्या निषेधार्थ मुरगूड येथे महाविकास आघाडीच्या वतीने बंद करण्यात आला. मुदाळतिट्टा- निपाणी रस्त्यावर मुरगूड येथे रास्ता रोको करीत केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरसेवक सुहास खराडे म्हणाले, मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे. केंद्र शासनाने सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात काम केले आहे. यावेळी नगराध्यक्ष राजेखान जमादार, मुरगूड शहर शिवसेना अध्यक्ष नामदेवराव मेंडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रणजित सुर्यवशी , विरोधी पक्षनेते नेते राहुल वडकर, प‌क्ष प्रतोद संदिप कलकुटकी, माजी नगरसेवक एस. व्ही. चौगले सुनिल चौगले, नगरसेवक मारुती कांबळे, सुनिल रंनवरे, अमर सणगर, दतात्रय मंडलिक, सचिन मेंडके, संजय गांधी निराधार समिती सदस्य राजू आमते, रंगराव चौगले, भगवान लोकरे आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर : बिद्रीत महाविकास आघाडीची निदर्शने

'महाराष्ट्र बंद'ला आज बिद्री, मुदाळतिट्टा, बिद्री परिसरात व्यापारी, दुकानदार यांनी आपले व्यवहार बंद ठेवत पाठिंबा दिला. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध फेरी काढली. कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करुन रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. मुरगूड पोलिसांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन करित रास्ता रोको मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या बाजूला उभे राहून निदर्शने करत वाहतूक सुरु केली. यावेळी जि. प. सदस्य मनोज फराकटे, कागल तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विकास पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे, जगदिश पाटील, डी. एम. चौगले, रघुनाथ कुंभार, नंदकुमार पाटील, पं. स. सदस्य जयदिप पोवार, प्रवीण पाटील, नागेश आसबे, राजेंद्र चौगले, बाळासाहेब फराकटे, विनोद पाटील यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लखीमपूर दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ वाशिम जिल्हा कडकडीत बंद

वाशिम ; पुढारी वृत्‍तसेवा :

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंदचे आवाहन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात कडकडीत बंद ठेवण्यात आला असून, अत्यावश्यक सेवा मधील दवाखाने, मेडिकल वगळता सर्वच बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यातील व्यापारी संघटनेकडून बंदला पाठिंबा दिला असून, आपले प्रतिष्ठान बंद ठेवली आहेत.

  • महाविकास आघाडीच्या बंदला पिंपरी चिंचवड मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

लखीमपूर येथे शेतकरी आंदोलकांवर भाजप मंत्र्यांच्या पुत्राने वाहन घातले. या घटनेत पाच शेतकऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सोमवारी महाविकास आघाडीतील पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला. या बंदला पिंपरी चिंचवड मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बंद मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडीचे पिंपरी-चिंचवडमधील नेते लोकांना करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी उपमहापौर डब्बू आसवानी, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले आदीनी पिंपरी पासून फेरी काढली. पिंपरी गाव, कॅम्प, भाजी मंडई, रिव्हर रोड, शगुन व तेथून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात ही फेरी गेली. मेडिकल, दूध, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानदारांना दुकाने बंदचे आवाहन करण्यात येत होते.

पीएमपीएमएल सेवा पूर्ण बंद ठेवण्यात आली होती. चिंचवड गाव, भोसरी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, प्राधिकरण, मोशी, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, चिखली या भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

  • तासगाव ग्रामीण भागात बंदला संमिश्र प्रतिसाद

तासगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात खासकरुन पुर्वेकडील गावामध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मोठी बाजारपेठ असलेल्या, मणेराजुरी, सावर्डे, सावळज, सिध्देवाडी, जरंडी, वायफळे, डोंगरसोनी गावातील बहूतांशी व्यवहार सकाळी सुरळीतपणे सुरु आहेत.

दरम्यान महाविकास आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेला समन्वय तीन पक्षांमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे मोठ्या गावात बाजारपेठा, गावोगावीची किराणा मालाची दुकाने, पान टपरीसह इतरही उद्योग आणि व्यवसाय सुरुच आहेत.

नवी मुंबईत महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद

  • नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : नवी मुंबईत महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई एपीएमसी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. तर महापालिका परिवहन उपक्रमांची एनएमएमटी बस सेवा काही वेळेपुरती सकाळ सत्रात सुरू केली होती. मात्र बेस्टने बस बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एनएमएमटी व्यवस्थापकांनी 75 मार्गावर धावणाऱ्या दोनशे बस 11 वाजता बंद केल्या. अनेक शाळांमध्ये 8 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. शहरातील सर्व बाजार, दुकाने,हाॅटेल बंद ठेवण्यात आले आहेत.
  • आताचं केंद्रातलं मुघलांचे सरकार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची टीका 
  • सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे- सुप्रिया सुळे
  • शिवसेना प्रणित अदानी इलेक्ट्रिसिटीमधील सर्व संघटना आणि स्थानिय लोकाधिकार समितीमधील कामगारांनी आज बंद पुकारला आहे. चेंबूरमधील अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयाबाहेर या कर्मचाऱ्यांनी निदर्शने सुरू केली आहेत. काळ्या फिती बांधून आणि घोषणाबाजी करीत कर्मचारी या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. लखीमपूर घटना , महागाई आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारवर टिका केली. भाईंदर ते चेंबूर अशा दहा झोनमध्ये या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सुमारे आठ ते दहा हजार या संघटनांचे कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर डिपार्टमेंट बंद ठेवण्यात आले आहेत.
    – कैलास चव्हाण (उपाध्यक्ष स्थानिय लोकाधिकार समिती)
  • मुंबई : महाराष्ट्र बंदचा बेस्टवर परिणाम, शहरातील विविध ठिकाणी 9 बस फोडल्या
  • मध्य, पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरु
  • काल मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान बेस्टच्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलीस संरक्षण घेतले असून परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व आगारातून बसगाड्या चालवण्यात येत आहेत.
  • सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात युवासेना आक्रमक, रस्त्यावर टायर जाळत महाराष्ट्र बंदला सुरुवात, शेतकरी जिंदाबादच्या घोषणा
  • कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी महामार्ग रोखला

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकर्‍यांना मोटारीखाली चिरडण्याच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी 'महाराष्ट्र बंद'ची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश ठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई-पुण्यातील व्यापार्‍यांनी विरोध केला आहे. काळ्या फिती लावून दुकाने सुरूच राहतील, अशी भूमिका मुंबई व्यापारी संघामार्फत वीरेन शाह यांनी मांडली आहे.

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणार्‍या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये, आवश्यक वस्तूंची वाहतूक वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, हा बंद महाराष्ट्र सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर आहे. नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, तसेच व्यापार्‍यांनी आस्थापना, दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन महाविकास आघाडीतील नेत्यांनी केले आहे.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय महाराष्ट्र बंदची घोषणा चार दिवसांपूर्वी केली होती. चौघा शेतकर्‍यांसह आठ जण या हिंसाचारात मृत्युमुखी पडले होते.

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भाजपने जाहीर विरोध केला आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन लावून अनेकांची रोजीरोटी हिरावली होती. आता पुन्हा तसाच प्रकार केला जात आहे, असे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापुरात महाविकास आघाडीची बाईक रॅली, बंदला पाठिंबा
कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी महामार्ग रोखला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT